Amruta Khanvilkar Chandra Song : चंद्रमुखी चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्यानं बॉलिवूडसह अनेकांना वेड लावलं आहे. महिलांसह अनेक तरुण या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील झेडपीच्या शाळेत शिकणाऱ्या एका चिमुकलीनं चंद्रा गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. चिमुकलीचा डान्स पाहून खुद्द अमृता खानविलकर देखील तिच्यावर फिदा झाली असून तिनं व्हिडिओ शेयर करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे. त्यामुळं आता या नव्या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोल्हापुरच्या अनुस्कुरा भागात राहणारी विद्यार्थीनी हर्षदा कांबळे या चिमुकलीनं अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्यावर डान्स केला आहे. तिची नृत्यशैली चांगली असल्यामुळं शाळेतील शिक्षकांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला. अनेकांनी व्हायरल व्हिडिओला दाद देत हर्षदाचं कौतुक केलं आहे. जेव्हा हा व्हिडिओ अमृता खानविलकरने पाहिला तर तिने थेट व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे. 'चिमुकली चंद्रा', असं सुपर कॅप्शन दिलं आहे. त्यानंतर अमृताच्या चाहत्यांनी देखील चिमुकलीचं कौतुक करत व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
चिमुकली हर्षदा कांबळे ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडील्या अनुस्कुरा भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. काही किलोमीटरची पायपीट करून ती शाळेत येत असते. हर्षदा अभ्यासात प्रचंड हुशार असून नृत्यकलेचीही तिला प्रचंड आवड आहे. याशिवाय तिने अनेक शालेस्तरीय स्पर्धांमध्येही भाग घेतलेला आहे. त्यामुळं अशी हुशार विद्यार्थीनी चंद्रा गाण्यावर थिरकल्यामुळं अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने गायलेल्या आणि अमृता खानविलकरने डान्स केलेल्या चंद्रा या गाण्यानं तरुणाईला चांगलंच वेड लावलं आहे.
संबंधित बातम्या