मनोरंजन विश्वात असे फार कमी स्टार्स आहेत, ज्यांनी साकारलेली पात्रे प्रेक्षकांच्या मनात आजन्म घर करून राहतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार झाले आहेत, ज्यांची पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. चित्रपटसृष्टीत खलनायक बनण्याचे स्वप्न पाहणारे कलाकार तसे क्वचितच पाहायला मिळतात. पण, आपल्या धडकी भरवणाऱ्या गेटअप आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करणारे मोठ्या पडद्यावरचे खलनायक अर्थात अभिनेते अमरीश पुरी यांचा आज (२२ जून) स्मृतिदिन आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अमरीश पुरी यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अभिनेते अमरीश पुरी यांनी वयाच्या ४०व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. मात्र, आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळवली. ते बॉलिवूडचे नंबर वन खलनायक बनले. मात्र, या यशासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. फिल्मी दुनियेत येण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीही सोडली होती.
अमरीश पुरी यांनी तब्बल २१ वर्षे कर्मचारी विमा महामंडळात लिपिक म्हणून काम केले होते. काम करण्यासोबतच त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न आपल्या हृदयात नेहमी जिवंत ठेवले आणि हार मानली नाही. कामासोबतच त्यांनी थिएटरही केले. रंगभूमीतून त्यांना खूप काही शिकायला मिळाले. अमरीश पुरी पृथ्वी थिएटरमध्ये काम करायचे. त्यावेळी ते सत्यदेव दुबे लिखित नाटकांमध्ये ते काम करायचे. दीर्घ काळ रंगभूमीवर काम केल्यानंतर त्यांच्या नशीबाचे तारे अचानक चमकले. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. वयाच्या ४०व्या वर्षी त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये अमरीश पुरी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत होते. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती १९७१मध्ये आलेल्या ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटातील भूमिकेमुळे... या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाने अमरीश पुरी यांना त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात आणले. त्यांचा लूक आणि दमदार शैलीने त्यांना बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित खलनायक बनवले. ‘मिस्टर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटात सुरुवातीला अनुपम खेर यांना ‘मोगॅम्बो’ म्हणून घेण्यात आलं होतं. मात्र, नंतर अचानक त्यांना बदलून अमरीश पुरी यांची निवड करण्यात आली होती.
अमरीश पुरी यांनी साकारलेल्या काही व्यक्तिरेखा आणि संवाद आजही लोकांच्या लक्षात आहेत. ‘मोगॅम्बो खुश हुआ’, ‘जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी’ हे अमरीश पुरी यांचे गाजेलेले डायलॉग आहेत, जे आजही आपल्याला त्यांची आठवण करून देतात. त्यांनी ‘गदर’, ‘नागिन’, ‘घायाल’, ‘कोयला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘करण-अर्जुन’, ‘इलाका’, ‘दामिनी’ आणि ‘चाची ४२०’सारखे हिट चित्रपट दिले आहेत.
संबंधित बातम्या