मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivpratap Garudzep Review: शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार

Shivpratap Garudzep Review: शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 06, 2022 12:13 PM IST

Shivpratap Garudzep: दिल्लीच्या तख्ताला मराठी मुलुखाचा स्वाभिमान सांगणारा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

शिवप्रताप गरुडझेप
शिवप्रताप गरुडझेप (HT)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आपण बऱ्याच वेळा ऐकतो, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये पाहात असतो. आपण शिवरायांच्या दिल्लीतील आग्र्याहून सुटकेचा थरार बराच वेळा ऐकला आहे. महाराजांनी औरंगजेबाच्या भूमीत जाऊन त्यालाच धूळ चारली होती. त्यांची ही 'आग्रा भेट' सर्वांनाच माहिती आहे. पण छत्रपतींचा हाच इतिहास 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की अनेकांच्या डोळ्यासमोर अभिनेते अमोल कोल्हे यांचा चेहरा येतो. त्यांनी छोट्या पडद्यावरील एका मालिकेत काम करत महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. आता 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासातील एक भयंकर संकट म्हणजे औरंगजेबाने केलेली नजरकैद. या नजरकैदेतून सुटून महाराज हे सुखरूप घरी परतले होते. 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट याच घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची सुरुवात ही औरंगजेबाच्या एण्ट्रीने होते. तो एका मंदिरात जाऊन रक्तपात करतो आणि त्या मंदिरावर हिरवा झेंडा फडकवतो. सूरतेची लूट आणि शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यानंतर औरंगजेब पेटून उठतो. त्याला महाराजांना काही करून संपवायचे होते.

चित्रपटातील महाराजांची एण्ट्री पाहण्यासारखी आहे. त्यांच्या एण्ट्रीने थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज येतो. औरंगजेब या सगळ्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग यांचा वापर करतो. मिर्झा राजे महाराजांची भेट घेतात. पण महाराज वाटाघाटीचा प्रयत्न करतात. राजे मिर्झा राजेंचे मन बदलण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ते अपयशी ठरतात. या अगदी उलट मिर्झा राजे आग्र्याचे निमंत्रण देतात. त्यानंतर चित्रपटाच्या कथेला खरी कलाटणी मिळते. या सगळ्यात मिर्झा राजे आणि महाराज यांच्यामधील संवाद अर्धवट वाटतात. तसेच महाराज दिल्लीला जाण्यासाठी कशा प्रकारे तयारी करतात हेही चित्रपटात दाखवण्यात आले नाही. अर्धवट सोडलेल्या काही सीन्समुळे पूर्वार्ध थोडा विस्कळीत वाटत असला तरी उत्तरार्ध रंजक ठरला आहे.

चित्रपटाला खरी मजा मध्यंतरानंतर येते. महाराज दिल्ली पोहोचतात. पण त्यांच्या स्वागतासाठी कोणीच नसते. त्यानंतर औरंगजेबाची भेट घेण्यासाठी दरबारात गेलेल्या महाराजांचा अपमान करण्यात येतो. दबारातील हा प्रसंग पाहाताना अक्षरश: अंगावर शहारे येतात. अपमान झाल्याने महाराज भर सभेतून निघून जातात. त्यानंतर औरंगजेब त्यांना नजरकैदेत ठेवतो आणि मारण्याचा कट रचतो. पण महाराज सुकटेसाठी आखणी करतात.

आपण आजवर केवळ इतिहासात ऐकलेली कथा समोर पडद्यावर पाहतानाची मजा काही औरच असते. तसेच प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी खिळवून ठेवण्याचा दिग्दर्शक कार्तिक केंडेचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कधी कठोर, कधी संयमी, कधी एक वडील, कधी एक पती अशा छटा त्यांनी उत्तमरित्या पार पडल्या आहेत. औरंगजेबाच्या भूमिकेत असणाऱ्या यतीन कार्येकर यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. तसेच शंभूराजे यांची भूमिका साकारणारा बालकलाकार हरक भारतीयने अभिनयाची छाप सोडली आहे.

चित्रपटात काही ठिकाणी VFXचा वापर करण्यात आला आहे. पण तो योग्य ठिकाणी करण्यात आला आहे. तसेच चित्रपटात दाखवण्यात येणारे रंग, लाइट्स यांचा देखील मेळ जमला आहे. लाल किल्ल्यामध्ये झालेले चित्रीकरण ही चित्रपटाच्या जमेची बाजू आहे. तांतत्रीक बाबींचा विचार केला तर थोडा कमकुवतपणा जाणवतो.

हिंदुस्तान टाइम्स मराठीकडून 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाला तीन स्टार…

IPL_Entry_Point

विभाग