Amitabh Bachchan Surgery: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या नव्या ब्लॉग पोस्टमधून हाताच्या शस्त्रक्रियेबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. ‘बिग बीं’नी याबाबत सांगताना म्हटले की, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग लाँच होण्यापूर्वी ते अक्षय कुमारसोबत शूटिंग करत होते. या दरम्यान त्यांनी काही फोटोशूट देखील केले आहे. या दरम्यान त्यांनी अक्षयसोबत त्यांच्या हाताच्या शस्त्रक्रियेबद्दल चर्चा केली. या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, अमिताभ बच्चन यांच्या मनगटावर पट्टी बांधलेली दिसत होती. मात्र, हाताच्या शस्त्रक्रियेबाबत त्यांनी अधिक काही माहिती दिली नाही.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘आयएसपीएल आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता सगळ्या मालकांना आणि सदस्यांना एका पिक्चर फ्रेममध्ये आणणे आवश्यक आहे. या सुंदर फोटो-मीट शूटमध्ये आम्ही धमाल केली आहे… या दरम्यान मी माझ्या मित्रांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत खूप छान वेळ घालवला आहे.. अक्षय या टीम मालकांपैकीच एक आहे.. या शूट दरम्याने त्याने मला माझ्या हाताच्या शस्त्रक्रियेबद्दल विचारणा केली. आम्ही यावर चर्चा देखील केली.'
आयएसपीएल ही भारतातील पहिली टेनिस बॉल टी-१० क्रिकेट स्पर्धा आहे, जी स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. २ मार्च ते ९ मार्च दरम्यान हे सामने मुंबईत होणार आहे. यामध्ये अनेक कलाकार स्वतःच्या टीम्समध्ये सामने खेळवणार आहेत. अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करीना कपूर खान यांच्यासह अक्षय कुमार, हृतिक रोशन, सुरिया आणि राम चरण यांच्या टीम्सचा देखील या सामन्यात समावेश आहे.
अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या आगामी चित्रपटात ते प्रभास, दीपिका पदुकोण यांच्या सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला ‘कल्की २९८९ एडी’ असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटातील त्यांचे काही लूक आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचा टीझर देखील खूप गाजला होता. या चित्रपटात सायफाय कथानक पाहायला मिळणार आहे. वयाच्या ८०चा टप्पा पार केलेले अमिताभ बच्चन या चित्रपटात अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहेत. मात्र, आता त्यांच्या हातावर सर्जरी झाल्याने चाहत्यांना त्यांची काळजी वाटते.