Amitabh Bachchan Property Distribution: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. बिग बी सध्या आपला 'कौन बनेगा करोडपती' हा शो होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन या शोमुळे नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय अमिताभ सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील छोटी-छोटी माहिती ते सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
बिग बींनी त्यांच्या आजवरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा प्रत्येक रुपयासाठी त्यांना मेहनत करावी लागत होती. अमिताभ बच्चन कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. पण, त्यांनी कधीच आपली हिंमत सोडली नाही आणि पुन्हा स्वत:ला या सगळ्यात खंबीरपणे उभं केलं. त्यांनी केवळ सगळं कर्जच फेडले नाही, तर अफाट संपत्तीही मिळवली. अलीकडेच अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या बातम्यांदरम्यान आता बिग बींची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी आपल्या संपत्तीच्या विभागणीबद्दल भाष्य केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी २०११मध्ये रेडिफला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी आपल्या एकूण मालमत्तेबद्दल आणि आपल्यानंतर ही मालमत्ता कुणाला मिळणार याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले होते. अमिताभ बच्चन म्हणाले की, 'मी मेल्यावर माझ्या मालकीची संपत्ती माझी मुलगी श्वेता बच्चन नंदा आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यात समान वाटली जाईल.' बिग बींनी आपल्या दोन मुलांमध्ये भेदभाव करणार नाही आणि आपल्याकडे जे थोडे आहे ते समान वाटून देऊ, यावर विशेष जोर दिला.
यावेळी अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासोबत मिळून अनेक वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता की, ते आपल्या मुलीला कधीही 'परक्याचं धन' मानणार नाही. बिग बींनी आपला बंगला जलसा आधीच आपली मुलगी श्वेताला गिफ्ट केला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये आहे. दरम्यान, हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४च्या अहवालानुसार, अमिताभ बच्चन १६०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत बॉलिवूड स्टार आहेत. नुकतेच बिग बी ‘कल्की २८९८ एडी’मध्ये दिसले होते. हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. अमिताभ यांच्यासह प्रभास, दिशा पाटणी, दीपिका पदुकोण, कमल हासन मुख्य भूमिकेत दिसले होते.