बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. एकेकाळी त्यांनी बॉलिवूडवर राज्य केले होते. त्यांचा १९८३ साली प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने तर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऋषी कपूर आणि वहिदा रहमान झळकले होते. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अमिताभ बच्चन यांचा मृत्यू होणार होता, पण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान असे काही घडले की क्लायमॅक्समध्ये अमिताभ यांचा मृत्यू दाखवणे त्यांना महागात पडू शकते, असे चित्रपट निर्मात्यांना वाटले. जाणून घेऊया निर्मात्यांनी क्लायमॅक्स बदलण्याचे कारण काय होते.
तुम्ही चित्रपटाचे नाव ओळखले का? 'कुली' असे या चित्रपटाचे नाव आहे. मनमोहन देसाई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याचबरोबर या चित्रपटाची कथा कादर खान यांनी लिहिली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता. २ डिसेंबर १९८३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
आयएमडीबीने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा क्लायमॅक्स लिहिला गेला होता ज्यात अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखेचा मृत्यू होणार होता. परंतु चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका फाइट सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांच्यावर जवळपास वर्षभर उपचार सुरू होते. या काळात त्यांनी जीवन-मरणाशी झुंज दिली. अमिताभ यांना जानेवारी १९८२ मध्ये दुखापत झाली. त्यावेळी या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यानंतर अमिताभ यांनी १९८३ मध्ये पुन्हा चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. अमिताभ यांचा फाइट सीन पुनीत इस्सरसोबत होता. या चित्रपटासाठी अमिताभ स्वत: सर्व अॅक्शन करत होते.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत हा अपघात झाला त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा शेवट बदलला. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अमिताभ यांचा गोळी लागून मृत्यू होणार होता. पण जेव्हा अमिताभ यांच्यासोबत अपघात झाला तेव्हा दिग्दर्शकांनी शेवट बदलण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर अमिताभ यांचा मृत्यू दाखवला तर प्रेक्षकांना तो आवडणार नाही आणि चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो, असे दिग्दर्शकांना वाटत होते.
वाचा: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक
अमिताभ बच्चन यांचा 'कुली' हा चित्रपट साडेतीन कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २१.१० कोटींचा व्यवसाय केला होता.
संबंधित बातम्या