महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही अशीच एक स्टार किड आहे जिने स्वत:च्या करिअरमध्ये एक वेगळा मार्ग निवडला आहे. सिनेसृष्टीत करिअर करण्याऐवजी नव्याने स्वत:साठी वेगळं करिअर निवडलं. तिला वडिलांप्रमाणे प्रसिद्ध बिझनेसमन व्हायचे आहे. दरम्यान, आता नव्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. तिचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. देशातील सुप्रसिद्ध इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न नव्याने नेहमीच जोपासले होते. आता तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
नव्या नवेली नंदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून नव्याने चाहत्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये अॅडमिशन मिळाल्याची माहिती दिली आहे. फोटो शेअर करताना नव्याने, 'स्वप्ने पूर्ण होतात. त्याचबरोबर २०२६ पर्यंत या संस्थेतून शिक्षण घेणार. पुढची २ वर्षे... सर्वोत्कृष्ट लोक आणि प्राध्यापकांसह! ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम (बीपीजीपी एमबीए)' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
नव्याने सोशल मीडियावर एक नाही तर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत ती कॉलेजच्या गेटवर उभी राहून आयआयएमच्या नावाजवळ पोझ देताना दिसत आहे. याशिवाय ती काही फोटोंमध्ये तिच्या कॉलेजची झलक दाखवली आहे तर काही फोटोंमध्ये तिच्या नवीन मित्र-मैत्रिणीआणि फॅकल्टीसोबत पोज देताना दिसत आहे. हे फोटो समोर येताच चाहत्यांनी तिला नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक युजर्स नव्याला तिच्या कोर्सबद्दल विचारताना दिसतात, ती इथे कोणता कोर्स करायला आली आहे असे प्रश्न विचारले आहेत.
वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, ते कपडे बदलताना पाहायचे; अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
नव्याच्या या फोटोंवर करिश्मा कपूरने देखील कमेंट केली आहे. तिने लिहिले की, 'अभिनंदन नव्या.' अनन्या पांडे, शनाया कपूर, झोया अख्तर यांनीही नव्याने प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट केली की, 'आपण काही तरी नॉर्मल बघूया. एक म्हणजे तुम्ही भारतात शिकत आहात आणि दुसरं नॉर्मल कोर्स करत आहात, नाहीतर तुम्ही एवढ्या मोठ्या कुटुंबात विचित्र कोर्सेस करता जे फार कमी लोक करतील.' आणखी एका युजरने लिहिले, 'बीपीजीपी कोर्सबद्दल कधी ऐकले नाही, हे काय आहे?' त्याचवेळी पेपर पास करून प्रवेश घेतला की पैसे देऊन, असा सवालही काही जणांनी केला. नव्याच्या पोस्टवर अशा अनेक कमेंट्स येत आहेत.