Amitabh Bachchan Ayodhya Plot: प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी आता अवघी अयोध्या नगरी सजली आहे. अयोध्येत रामाचा जयजयकार सुरू असतानाच आता महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्यावासी होण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांनी आता अयोध्येत भूखंड खरेदी केला असून, त्यावर आता आलिशान बंगला बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांनी विकत घेतलेली ही जागा राम मंदिरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. मोठी रक्कम देऊन अमिताभ बच्चन यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सेव्हन स्टार टाऊनशिप सरयूमध्ये अभिनंदन लोढा यांच्याकडून हा भूखंड खरेदी केला आहे. अभिनंदन लोढा हे मुंबई स्थित डेव्हलपर ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’चे अध्यक्ष आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेला हा प्लॉट नेमका किती मोठा आहे आणि त्याची किंमत किती आहे, याची माहिती समोर आली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन तब्बल १४.५ कोटी रुपये खर्चून या जागेवर १०००० चौरस फुटांचे आलिशान बंगला बांधणार आहेत. या प्लॉटची किंमत किती आहे, हे देखील अद्याप समोर आलेले नाही.
अमिताभ बच्चन यांनी ज्या ठिकाणी हा प्लॉट खरेदी केला आहे, त्या ‘सरयू इन्क्लेव्ह’चे उद्घाटन देखील २२ जानेवारी रोजीच होणार आहे. या प्रोजेक्ट एकूण ५१ एकरांमध्ये पसरला असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘माझ्यासाठी ही जागा खूपच खास आहे. या जागेवर स्वतःचं घर बांधण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. अयोध्येत संस्कृती आणि अध्यात्माचा एक विलक्षण मिलाप आहे. हे शहर जितकं पारंपारिक आहे, तितकंच आधुनिक देखील आहे. या ग्लोबल स्पिरिच्युल ठिकाणी मला घर बांधायचं आहे.’
अमिताभ बच्चन प्रॉपर्टीमध्ये भरपूर गुंतवणूक करताना दिसतात. या आधी त्यांनी लखनौजवळील काकोरी येथे जमीन खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन हे स्वतः अलाहाबादचे आहेत. त्यांची लखनौस्थित जमीन देखील अयोध्येपासून अवघ्या ४ तासांच्या अंतरावर आहे. आता अयोध्येतील 'द सरयू'मध्ये अमिताभ बच्चन हे पहिले रहिवासी असणार आहेत. ‘द सरयू एन्क्लेव्ह’ हे ठिकाण अयोध्येच्या राम मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तर, या ठिकाणाहून अयोध्या विमानतळ अवघ्या ३० मिनिटांवर आहे.