सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. आतामध्ये आणखी एक चित्रपट सामील झाला आहे. या चित्रपटाचे नाव 'लापता लेडीज' असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूड अभिनेता आमिर खानची पूर्वपत्नी किरण रावने केले आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. नुकताच 'लापता लेडीज' या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'लापता लेडीज' चित्रपटाच्या २ मिनिटे २६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एका युवकाचे नुकताच लग्न झाले असते. तो पत्नीसह घरी परतत असताना त्याच्या पत्नीची आदलाबदली होते. जेव्हा घरातील कुटुंबीय त्या मुलीला तोंडावरील घुंगड काढण्यास सांगतात तेव्हा कळते ही दुसरी मुलगी आहे. युवक या नव्या मुलीला पाहून चक्रावून जातो. त्यानंतर तो युवक पत्नीच्या शोधात पोलीस ठाण्यात देखील जातो. आता पोलीस त्याच्या पत्नीला शोधणार का? त्या दुसऱ्या मुलीचा त्या युवकाच्या घरी येण्याचा काही हेतू असतो का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
वाचा: "मेरी कहानी का हर पन्ना खून से लिखा था", अंगावर शहारे आणणारा आर्या ३चा ट्रेलर रिलिज
'लापता लेडीज' नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावने पुन्हा एकदा आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. तब्बल १४ वर्षानंतर किरण राव कमबॅक करताना दिसणार आहे. तिने 'धोबी घाट' या चित्रपटाचे शेवटचे दिग्दर्शन केले होते. आता सध्या सर्वत्र किरणच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
'लापता लेडीज' या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे तर आमिर खानने चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा बिप्लाब गोस्वामी यांनी लिहिली आहे. तर स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन स्नेहा देसाई यांनी केले आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.