गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. तसेच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे. कारण छोट्या पडद्यावर हा चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे पाहायला मिळणार हा चित्रपट...
'आम्ही जरांगे' चित्रपटाचे केंद्रबिंदू म्हणजे मराठा आरक्षण चळवळीतील नायक मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष. मकरंद देशपांडे, प्रसाद ओक आणि सुबोध भावे यांचा अप्रतिम अभिनय असलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये तुफान यश मिळवले होते. मकरंद देशपांडे यांनी साकारलेली मनोज यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. त्यांच्या सोबत प्रसाद ओक यांनी अण्णासाहेब जावळे पाटील आणि अजय पुरकर यांनी माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका ताकदीने साकारली आहे. या कथानकात मराठा क्रांतिकारकांनी आपल्या हक्कांसाठी दिलेला दीर्घ संघर्ष आणि त्यागाची कहाणी रेखाटण्यात आली आहे. आम्ही जरांगे फक्त एक साधा चित्रपट नाही, तर एक संघर्ष आणि नेतृत्वाची प्रेरणादायी कहाणी आहे, जी मराठा समाजाच्या इतिहासाला उजाळा देते.
मकरंद देशपांडे, प्रसाद ओक, सुबोध भावे आणि अजय पुरकर यांचा अभिनय प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास घडवतो, जिथे प्रत्येक पात्राचे योगदान चळवळीला वेगवेगळ्या पद्धतीने समोर आणते. चित्रपटाच्या ताकदीमुळे त्यातील कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाने थिएटरमध्ये धडाक्यात यश मिळवले आणि आता त्याचीच जादू टीव्हीवर अनुभवायला मिळणार आहे.
वाचा: ७० दिवसातच ‘बिग बॉस मराठी ५’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी होणार फिनाले
मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत चर्चेत असलेला आणि थिएटरमध्ये प्रचंड यश मिळवलेला आम्ही जरांगे हा चित्रपट आता झी टॉकीजच्या माध्यमातून पहिल्यांदाच टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहे.