मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jaggu ani Juliet Movie Review: प्रेमाचे रंग उलघडणारा 'जग्गू आणि ज्युलिएट'

Jaggu ani Juliet Movie Review: प्रेमाचे रंग उलघडणारा 'जग्गू आणि ज्युलिएट'

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 10, 2023 11:45 AM IST

Amey Wagh: कसा आहे अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांचा ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट जाणून घ्या कथा..

जग्गू आणि ज्युलिएट
जग्गू आणि ज्युलिएट (HT)

आरती बोराडे

प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या असतात. प्रत्येक व्यक्तीनुसार त्या बदलतात अशाच काही व्याख्या दिग्दर्शक महेश लिमये यांनी 'जग्गू आणि ज्युलिएट' या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जग्गू आणि ज्युलिएट या चित्रपटाची सुरुवात ही देवभूमीमधून होते. उत्तराखंडला आलेल्या योगा टूरमधील काही जोडप्यांमधून तर एकट्या आलेल्या इसामाकडून सप्तरंगी प्रेमाची व्याख्या कळते. तसेच आई नसलेल्या मुलांचे त्यांच्या वडिलांसोबत नाते कसे असते हे दाखवण्याचा प्रयत्न महेश लिमये यांनी चित्रपटात केला आहे.

'जग्गू आणि ज्युलिएट' या चित्रपटाची सुरुवात जग्गू काळणने म्हणजेच अमेय वाघने होते. जग्गूचे तात्या एका लॉटरी तिकिटात उत्तराखंडमधील ट्रीपची तिकिटे जिंकतात आणि ते जग्गूला तेथे पाठवतात. जग्गू हा वर्सोव्यातील एका श्रीमंत कोळ्याचा मुलगा दाखवला आहे. पण तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. तर ज्युलिएट ही अमेरिकेत जन्माला आलेली जुलि चितळे म्हणजेच वैदेही परशुरामी आहे. तिला जगभरात फिरायचे आहे. तिची आई देखील या जगात नाही. या दोघांचेही त्यांचा वडिलांसोबत असलेले नाते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. जग्गू हा त्याच्या तात्यांशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही. त्याचे तात्यांवर प्रचंड प्रेम असते. तर दुसरीकडे ज्युलि तिच्या वडिलांचा राग असते. भारतात टूरला आल्यावर ती त्यांचा एकही फोन घेत नाही. मात्र जग्गू तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिचे वडिलांसोबतचे नाते पूर्णपणे बदलते.

चित्रपटाच्या नावावरुन चित्रपटाची कथा ही केवळ जग्गू आणि ज्युलिएटची आहे असे वाटेल. पण ती त्या दोघांपूरताच मर्यादीत नसून योगा टूरला आलेल्या इतर कपलचीही दाखवण्यात आली आहे. तसेच घटस्फोटानंतर एकट्या राहणाऱ्या लोकांचा जगण्याचा दृष्टीकोनही यामध्ये दाखवण्यात आला आहे. जग्गू उत्तराखंडला आलेल्या टूरमध्ये मिस्टर-मिसेस गुप्ते म्हणेज अंगद मस्कर आणि अभिज्ञा भावे हे घटस्फोट घेण्याच्या उंठबरठ्यावर असलेले जोडपं आहे. तसेच सोशल मीडियावर सतत रमणारे मिस्टर आणि मिसेस निमकर म्हणेज समीर चौघुले-केयुरी शाह आहेत. तिसरं एक घैसास एक जोडपं आहे ज्यांना मुलं होत नाहीये. (अविनाश नारकर- सविता मालपेकर). घटस्फोटीत मदन शृंगारपुरे म्हणजेच समीर धर्माधिकारी देखील आहे. ही सर्व जोडपी चित्रपटात प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगतात. या सगळ्या जोडप्यांच्या कथा या प्रेक्षकांना अगदी आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. चित्रपटातील अविवाहीत प्रविण तरडे यांची हटके भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल.

जग्गू या चित्रपटात 'ती'च्या शोधात असतो. अखेर त्याला उत्तराखंडमध्ये ती सापडते. विल्यम शेक्सपिअरच्या 'रोमियो-ज्युलिएट' या पात्रांचा आधार घेत चित्रपटाची कथा फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. जग्गूच्या आयुष्यात जुलि येते आणि सर्वकाही बदलते. पण जग्गू आणि जुलि एकत्र येतात की त्यांचे पुढे काय होते? हे तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.

अमेय वाघच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर त्याने जग्गू हे पात्र अप्रतिम साकराले आहे. त्याच्या तोंडून निघणारी आगर-कोळी भाषा प्रेक्षकांची मने जिंकते. तर दुसरीकडे जुलिची भाषा थोडी खटकते. अमेरिकेत लहानाची मोठी झालेली जुलिच्या तोंडून येणारी मराठी भाषा खटकणारी आहे. चित्रपटातील जमेची बाजू म्हणजे देवभूमितील अनेक ठिकाणी केलेले चित्रीकरण. प्रेक्षकांची चित्रपट पाहाताना उत्तराखंडाची टूर नक्की होईल. तसेच चित्रपटातील अजय-अतुलच्या गाण्याने या लव्हस्टोरीमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील काही सीन हे अर्धवट सोडले आहेत.

हिंदुस्तान टाइम्स मराठीकडून चित्रपटाला ३.८ स्टार

IPL_Entry_Point

विभाग