Ameen Sayani Bollywood Nostalgia: रेडिओ विश्वाचे बादशाह म्हणवल्या जाणाऱ्या अमीन सयानी यांचे आज (२१ फेब्रुवारी) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रेडिओ विश्वाच्या सुवर्ण इतिहासातील एक अध्याय संपूर्ण झाला. ‘नमस्कार भाईयों और बहनो, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं…’ असं म्हणत त्यांनी रसिक श्रोत्यांना नेहमीच मंत्रमुग्ध केलं होतं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अमीन सयानी यांच्या या सुवर्ण कारकिर्दीतील अनेक किस्से नेहमीच प्रेक्षकांना सुखावणारे ठरलेत. असाच एक किस्सा अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील घडला होता. अमीन सयानी यांच्यामुळेच बॉलिवूडला अमिताभ बच्चन लाभले, असे नेहमीच म्हटले जाते. यामागे देखील एक भन्नाट किस्सा आहे.
अमीन सयानी यांनी अमिताभ बच्चन यांना रिजेक्ट केलं होतं, असा किस्सा अनेकदा सांगितला जातो. स्वतः अमिताभ बच्चन यांनी देखील एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. मात्र, अमीन सयानी यांनी यामागचा पूर्ण किस्सा नंतर झालेल्या एका मुलाखतीत सांगितला होता. जेव्हा, अमिताभ बच्चन यांनी अमीन सयानी यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनीच आपल्याला आवाज न ऐकता कसं रिजेक्ट केलं होतं, या बद्दल सांगितलं तेव्हा स्वतः अमीन सयानी देखील आश्चर्यचकित झाले होते. याबद्दल सांगताना अमीन सयानी म्हणाले की, ‘त्याकाळी अमिताभ बच्चन यांचा ‘आनंद’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा आवाज आणि अभिनय मला आवडला होता. त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करायचं निर्णय घेतला होता.’
पुढे बोलताना अमीत सयानी म्हणाले की, ‘मी चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मी वेळीच स्वतःला थांबवलं. कारण मला या सगळ्यात पडायचं नव्हतं. अमिताभ बच्चन हिट होतील हे आधीच माहित होतं. त्यावेळी ते जयाजींना डेट देखील करत होते. नंतर एकदा मी स्वतः अमिताभ बच्चन यांना रेडिओच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. त्यावेळी अमिताभ यांनी रिजेक्शनचा किस्सा सांगितला. त्यांना ऑडिशन न घेताच नाकारलं गेल्यामुळेच अमिताभ अभिनयाकडे वळले. नाहीतर आजघडीला अमिताभ बच्चन हे अतिशय प्रसिद्ध ब्रॉडकास्टर असते.
या मागचा खरा किस्सा सांगताना अमीन सयानी म्हणाले की, ‘माझी पत्नी देखील तेव्हा माझ्यासोबत रेडिओ सिलोनमध्ये काम करायची. हा किस्सा ऐकून तिने मला याबद्दल प्रश्न केला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, एक दिवशी माझ्या सेक्रेटरीने मला सांगितलं होतं की, एक माणूस मला भेटायला आला आहे, ज्याचं नाव अमिताभ बच्चन आहे. तेव्हा मी तिच्याकर्वे अमिताभ यांना सांगितलं की, पूर्वपरवानगी घेऊनच मला भेटायला या. मात्र, दुसऱ्यावेळी देखील अमिताभ बच्चन अपाँटमेंट न घेताच आले होते. त्यावेळी मी स्वतः त्याची माफी मागून भेटण्यास नकार दिला होता. कारण त्यावेळी माझ्याकडे खरंच अजिबात वेळ नव्हता. मात्र, जे झालं ते खरंच योग्य झालं. नाहीतर मी त्यांना भेटलो असतो, मला त्यांचा आवाज आवडला असता आणि त्यांना कामही मिळालं असतं. मात्र, यामुळे अमिताभ आवाजाच्या दुनियेत बादशाह बनले असते आणि बॉलिवूडला त्यांचा महानायक मिळाला नसता.’