अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीन मंजूर झाल्यानंतरही एक रात्र अल्लू अर्जुनला तुरुंगात घालवावी लागली आहे. आज सकाळी अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका करण्यात आली. अल्लू अर्जुनच्या सुटकेपूर्वी चाहते चंचलगुडा कारागृहाबाहेर पोहोचले. मात्र, अल्लू अर्जुनला कारागृहाच्या मागच्या गेटमधून बाहेर काढण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या वडिलांसोबत गीता आर्ट्स कार्यालयात पोहोचला. काही दिग्दर्शक आणि सिनेसृष्टीतील लोक त्यांना भेटण्यासाठी येथे आले होते. यानंतर अल्लू अर्जुन त्याच्या घरी पोहोचला. त्याला पाहून त्याच्या मुलाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.
तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबाला भेटताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनची मुलगी, मुलगा आणि पत्नी दिसत आहेत. वडिलांना पाहून अल्लू अर्जुनचा मुलगा आनंदाने उड्या मारताना दिसतो. त्यानंतर तो पत्नीला मिठी मारतो. पतीला मिठी मारताच अल्लू अर्जुनची पत्नी भावूक होते.
१३ डिसेंबर रोजी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती. त्यानंतर त्याला नामपल्ली फौजदारी न्यायालयात नेण्यात आले. येथे त्याला १४ दिवसांच्या रिमांडवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतरही अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनला तुरुंगात कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नाही.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. ४ डिसेंबर ला अल्लू अर्जुन चाहत्यांसोबत आपला पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, चेंगराचेंगरी होऊन एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला.
संबंधित बातम्या