मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jawan: शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये जबरदस्त ट्विस्ट; ‘पुष्पा’च्या एन्ट्रीने पडद्यावर होणार धमाल!

Jawan: शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये जबरदस्त ट्विस्ट; ‘पुष्पा’च्या एन्ट्रीने पडद्यावर होणार धमाल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 13, 2023 04:55 PM IST

Jawan Update: अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार असून, लेडी सुपरस्टार नयनतारा देखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Jawan
Jawan

Jawan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. नव्या वर्षात शाहरुख खान चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी देणार आहे. तब्बल ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा शाहरुख खान या वर्षी आणखी दोन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, सध्या ‘पठाण’ची हवा चालू असताना आता शाहरुखचा आगामी चित्रपट ‘जवान’ची देखील चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात आता साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची एन्ट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार असून, लेडी सुपरस्टार नयनतारा देखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे चेन्नईमध्ये शूटिंग सुरू असून, लवकरच या चित्रपटात ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुन याची एन्ट्री होणार आहे. अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, ‘जवान’ या चित्रपटात एका कॅमिओ भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला विचारणा झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे.

एकीकडे शाहरुख खान आणि नयनतारा त्यांच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून. दुसरीकडे अल्लू अर्जुन देखील त्याच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने अल्लू अर्जुन याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. ‘पुष्पा’ या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अभिनयासह या चित्रपटातील गाण्यांनी देखील कल्ला केला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग येणार असून, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट २ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. शाहरुखशिवाय विजय सेतुपती, योगी बाबू, नयनतारा आणि प्रियामणी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

WhatsApp channel