Allu Arjun Pushpa 2 : सध्या ‘पुष्पा २’मुळे चर्चेत असलेला अल्लू अर्जुन आता अडचणीत संपडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभिनेत्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. त्याचा बहुचर्चित ‘पुष्पा २’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २'चं स्क्रिनिंग पार पडलं होतं. अल्लू अर्जुन आपल्या चाहत्यांना कसलीही कल्पना न देता सरप्राईज देण्यासाठी तिथे स्क्रिनिंगमध्ये पोहोचला होता. अशावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आणि तिथे चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.
हैदराबादच्या पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, थिएटर मॅनेजमेंट किंवा अभिनेत्याच्या टीमकडून ते थिएटरला भेट देणार असल्याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नाट्यगृह व्यवस्थापनाने गर्दी व्यवस्थापनासाठी सुरक्षेसंदर्भात कोणतीही अतिरिक्त तरतूद केली नव्हती. तसेच, अभिनेत्याच्या टीमसाठी स्वतंत्र प्रवेश किंवा बाहेर पडण्याची व्यवस्था नव्हती. थिएटर व्यवस्थापनाला त्याच्या आगमनाची आधीच कल्पना होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, संध्या थिएटरविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात अल्लू अर्जुनचेही नाव आरोपी म्हणून असण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर चित्रपटाचे निर्माते मैत्री मूव्ही मेकर्स यांनी एक निवेदन जारी केले आहे. ‘काल रात्री स्क्रिनिंगदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेने आम्हाला खूप दु:ख झाले आहे. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना उपचार घेत असलेल्या मुलासोबत आणि कुटुंबासोबत आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास आणि सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहोत.’
अल्लू अर्जुन चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी बुधवारी रात्री संध्या थिएटरमध्ये आला होता. थिएटरबाहेर जमलेले चाहते अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी उत्सुक होते. त्याच्यासोबत मोठ्या संख्येने चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे चेंगराचेंगरी झाली. धक्काबुक्की आणि गदारोळामुळे अनेक जण एकमेकांवर पडले. काही लोक जखमीही झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गर्दी ओसरल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एका महिलेला मृत घोषित केले, तर तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर आता अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासह थिएटर व्यवस्थापनावरही कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन न केल्याचा आरोप आहे. '