साऊथ चित्रपटाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा २: द रुल'साठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे सातत्याने येणारे अपडेट्स त्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. चाहते आता या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. २ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.
या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या उत्साहात भर घालत, चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले, ज्यामध्ये एका पायाचा क्लोज-अप शॉट दिसत आहे. या पायात घुंगरू बांधलेले असून, संपूर्ण पायाला सिंदूर लावलेले दिसत आहे. त्याचवेळी पोस्टरमध्ये सर्वत्र लाल कुंकू उडताना दिसत आहे. अल्लू अर्जुनची हटके आणि वेगळी स्टाईल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. घुंगरू बांधलेले हे पायही अभिनेत्याचेच असल्याचे म्हटले जात आहे.
‘पुष्पा २: द रूल’ या पोस्टरसह चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर मोस्ट अवेटेड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचे या पोस्टरमध्ये लिहिले आहे. ट्वीटरवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी लिहिले, 'चला 'पुष्पा मास जत्रा' सुरू करूया. बहुप्रतिक्षित 'पुष्पा २: द रुल'चा टीझर ८ एप्रिल रोजी दुप्पट ताकदीने येत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती ‘पुष्पा’च्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘पुष्पा २: द रुल’ १५ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात समंथा रुथ प्रभूही कॅमिओमध्ये दिसू शकते. या चित्रपटात संजय दत्तचीही खास भूमिका असण्याची शक्यता आहे.
अल्लू अर्जुनला नुकतीच एक मोठी भेट मिळाली आहे. अलीकडेच दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात त्याच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करून, त्याला वाढदिवसाची भेट देण्यात आली आहे. त्याच्या या मेणाच्या पुतळ्यामध्ये तो 'पुष्पा: द राइज' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'झुकेगा नहीं साला' ही सिग्नेचर पोज देताना दिसत आहे. अलीकडेच अल्लू अर्जुन दुबईत एका कार्यक्रमात कुटुंबासह सहभागी झाला होता.