संध्या थिएटर प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची शनिवारी पहाटे हैदराबादच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी घराबाहेर तुफान गर्दी केली आहे. त्यामुळे सुटकेपूर्वीच अल्लू अर्जुनच्या घराबाहेर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. शुक्रवारी त्याला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.
न्यायालयाने अल्लू अर्जुनला अर्जुनला १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर शुक्रवारी त्याला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. अर्जुनचे सासरे कंचर्ला चंद्रशेखर रेड्डी हे अर्जुनला घरी नेण्यासाठी तुरुंगात पोहोचले होते. अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी हैदराबाद तुरुंग प्रशासनावर अल्लू अर्जुनला दिलेल्या जामीन आदेशाचे पालन न केल्याबद्दल टीका करताना दिसत आहेत. 'अल्लू अर्जुनची तात्काळ सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना दिले असून अधीक्षकांनी सुटकेचे आदेश दिले आहेत, मात्र आदेश असूनही ते त्याची सुटका करत नाहीत,' असे वकिलांनी सांगितले.
४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन आणि पुष्पा २ ची टीम हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये स्क्रीनिंगसाठी गेली होती. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी थिएटर बाहेर तुफान गर्दी जमली होती. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाढीचार देखील केला. दरम्यान, एका ३५ वर्षीय महिलेचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. तसेच तिच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
वाचा: महेश कोठारेंनी शरद तळवकरांना दिली होती 'धुमधडाका' सिनेमातून काढून टाकण्याची धमकी, काय होते कारण?
मध्य विभागाचे पोलिस उपायुक्त म्हणाले, 'संध्या सिने एंटरप्रायजेस ७० एमएमने एसीपी चिक्कडपल्ली यांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात पुष्पा-२ च्या प्रदर्शनासंदर्भात ०४/०५-१२-२०२४ रोजी बंदोबस्तची विनंती करणारे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहे. काही राजकीय व्यक्ती, चित्रपट सेलिब्रेटींच्या भेटी, धार्मिक कार्यक्रम इत्यादींचा हवाला देत आपल्याकडे बंदोबस्तासाठी अनेक विनंत्या येतात, मात्र प्रत्येकासाठी बंदोबस्त पुरविणे आपल्या संसाधनांच्या पलीकडचे आहे.'