मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘फ्लॉवर नही फायर है...’ म्हणणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुनबद्दल ‘या’ गोष्टी कधी ऐकल्यात का?

‘फ्लॉवर नही फायर है...’ म्हणणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुनबद्दल ‘या’ गोष्टी कधी ऐकल्यात का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 08, 2024 07:52 AM IST

AA ही अक्षर एखाद्या व्यक्तीला अगदीच सामान्य वाटू शकतील. मात्र, तिच अक्षरं तुम्ही एखाद्या साऊथ फॅनला दाखवलीत, तर पहिलं उत्तर येईल ते म्हणजे अल्लू अर्जुन.

‘फ्लॉवर नही फायर है...’ म्हणणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुनबद्दल ‘या’ गोष्टी कधी ऐकल्यात का?
‘फ्लॉवर नही फायर है...’ म्हणणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुनबद्दल ‘या’ गोष्टी कधी ऐकल्यात का? (PTI)

‘पुष्पा... फ्लॉवर नही फायर है मै’ म्हणत जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा अभिनेता अल्लू अर्जुन आज (८ एप्रिल) आपला ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. आजघडीला AA ही अक्षर एखाद्या व्यक्तीला अगदीच सामान्य वाटू शकतील. मात्र, तिच अक्षरं तुम्ही एखाद्या साऊथ फॅनला दाखवलीत, तर पहिलं उत्तर येईल ते म्हणजे अल्लू अर्जुन. AA हा आता अल्लू अर्जुनचा ट्रेडमार्क झाला आहे. २०२१मध्ये रिलीज झालेला ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटानंतर अल्लूच्या करिअरने अशी काही भरारी घेतली की, जिथे तो एका चित्रपटासाठी १८ ते २० कोटी रुपये घेत होता, तिथे आता तो ९० ते १५० कोटी रुपये आकारतो.

ट्रेंडिंग न्यूज

आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा: द रूल’साठी चाहते आतुर झाले आहेत. या दुसऱ्या भागासाठी अल्लू अर्जुन ३३० कोटी रुपये फी आकारल्याचे म्हटले जात आहे. आज ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुन त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करत असून, या निमित्ताने ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. हा टीझर पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

कधी केली कारकिर्दीची सुरुवात?

अभिनेता अल्लू अर्जुन याने वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या अल्लू अर्जुनला अभिनयाचा वसा कुटुंबाकडूनच मिळाला होता. १९८५मध्ये प्रदर्शित झालेला चिरंजीवी अभिनित ‘विजेता’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. यानंतर अल्लू अर्जुन कमल हसनच्या ‘स्वाती मुथ्यम’ या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून झळकला. त्यानंतर २००३मध्ये अल्लू अर्जुनने ‘गंगोत्री’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला, तरी या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा नंदी पुरस्कार मिळाला होता.

Gangu Ramsay Passes Away: आपल्या चित्रपटांनी लोकांचा थरकाप उडवणारे गंगू रामसे काळाच्या पडद्याआड

‘आर्य’ने बदललं नशीब

यानंतर त्याच्या हातात ‘आर्य’ हा चित्रपट आला. मे २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. अवघ्या ४ कोटीत बनलेल्या या चित्रपटाने तब्बल ३० कोटींची कमाई केली. या चित्रपटाने अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळवून दिली. तर दिग्दर्शक म्हणून सुकुमार याचाही हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटासाठी सुकुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार, तर अल्लू अर्जुनला स्पेशल ज्युरी कॅटेगरीत नंदी पुरस्कार मिळाला. पुढे हा चित्रपट हिंदीत देखील डब झाला आणि चित्रपटाने अल्लू अर्जुनला हिंदीत लोकप्रियता मिळवून दिली.

अल्लू अर्जुनचे गाजलेले चित्रपट

‘आर्य’नंतर अल्लू अर्जुनने, ‘बनी', 'हॅपी', 'देसमुदुरु' आणि 'पारुगु' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचे हे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले. २००९मध्ये रिलीज झालेल्या ‘आर्य २’ या चित्रपटात त्याने पुन्हा एकदा सुकुमारसोबत एकत्र काम केले आणि या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. याशिवाय अल्लू अर्जुनने 'वेदम', 'जुलाई', 'सन ऑफ सत्यमूर्ती', 'सरायनोडू', 'डीजे' आणि 'आला वैकुंठपुरमलो' अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘आला वैकुंठपुरमलो’ हा अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील गेम चेंजर चित्रपट ठरला. या चित्रपटातील त्याच्या स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावलं.

राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला अभिनेता!

या दरम्यान, अल्लू आणि सुकुमार एकत्र येऊ शकले नाहीत. २०१९मध्ये सुकुमारने पुन्हा घोषणा केली की, तो अल्लू अर्जुनसोबत नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव होते ‘पुष्पा: द राईज’. या चित्रपटाचे शूटिंग २०१९च्या ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं होतं. कोरोनाच्या प्रभावामुळे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण व्हायला दोन वर्ष गेली. १७ डिसेंबर २०१९ रोजी पाच मुख्य भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुनची मागणी खूप वाढली. एखाद्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी तो एका दिवसाचे ३५ लाख रुपये घेत होता. मात्र, पुष्पाच्या यशानंतर आता अभिनेता एका जाहिरातीसाठी रोजचे सहा कोटी रुपये आकारतो असे म्हटले जाते. नुकताच अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. तेलुगु सिनेमाच्या इतिहासात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिला अभिनेता ठरला आहे.

IPL_Entry_Point