All The Best: मुक्या, बहिऱ्या अन् आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी; रंगमंचावर पुन्हा होणार 'ऑल द बेस्ट'!-all the best marathi natak relaunching from this year first show on 2 nd february 2024 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  All The Best: मुक्या, बहिऱ्या अन् आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी; रंगमंचावर पुन्हा होणार 'ऑल द बेस्ट'!

All The Best: मुक्या, बहिऱ्या अन् आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी; रंगमंचावर पुन्हा होणार 'ऑल द बेस्ट'!

Jan 24, 2024 01:06 PM IST

All The Best Marathi Natak: तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभूमीवर मोठा इतिहासचं घडवला होता.

All The Best Marathi Natak
All The Best Marathi Natak

All The Best Marathi Natak: काही वर्षांपूर्वी देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ हे धमाल विनोदी नाटक रंगभूमीवर तुफान गाजलं होतं. देवेंद्र पेम लिखित ही एकांकिका ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली होती. याच गाजलेल्या एकांकीचे रुपांतर नाटकात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. ३१ डिसेंबर १९९३ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला होता. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभूमीवर मोठा इतिहासचं घडवला. पुन्हा एकदा हे नाटक आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘ऑल द बेस्ट’ या धमाल नाटकाने मराठी मनोरंजन विश्वाला भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर असे दिग्गज सुपरस्टार दिले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मुका, बहिरा व आंधळा अशा मित्रांची कथा असलेलं हे धमाल नाटक रसिकांनी चांगलंच डोक्यावर उचलून धरलं होतं. या नाटकाला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं होतं की, नाटकाच्या अधिकच्या प्रयोगांसाठी एकाच वेळी तीन टिम्स 'ऑल द बेस्ट'चे प्रयोग करत होत्या. दर महिन्याला या नाटकाचे साठ ते सत्तर प्रयोग व्हायचे. नाटकाच्या पहिल्या पाच वर्षात तब्बल २१०० प्रयोग झाले होते.

Republic Day 2024: बॉलिवूडच्या अभिनेत्रींनीही मोठ्या पडद्यावर दाखवली देशभक्ती! ‘हे’ पाच चित्रपट आवर्जून बघाच!

'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही, तर विविध भाषिक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झालं असून, त्याचे जवळ जवळ १०००० प्रयोग झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. रसिक प्रेक्षकांचं हेच प्रेम लक्षात घेऊन ‘ऑल द बेस्ट’ हे मराठी नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. या नव्या ‘ऑल द बेस्ट’मध्ये मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री हे कलाकार झळकणार असून, या कलाकारांनी नाटकाची जोरदार तालीम सुरु केली आहे.

'अनामय' नाट्यसंस्थेची निर्मिती असणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग २ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. नव्या नाटकातील तरुण कलाकारही या गाजलेल्या नाटकासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत. या नाटकावर मराठी रसिकांनी अपार प्रेम केलं. त्यांना हे नाटक पुन्हा पाहायला निश्चित आवडेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र पेम यांनी दिली आहे.

विभाग