Akshay Kumar Viral Video During casting Vote : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार बुधवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४चं मतदान करण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र, यावेळी अक्षय कुमारसोबत एक वेगळाच किस्सा घडला आहे. अक्षय मतदान करण्यासाठी जात असताना एका वृद्ध व्यक्तीने त्याला रोखले. त्या भागात लावलेली बायो टॉयलेट सडल्याची तक्रार त्यांनी केली. अक्षय कुमारने २०१८ मध्ये त्या भागात बसवलेल्या बायो टॉयलेटबद्दल ही व्यक्ती तक्रार करत होती. त्यावर अक्षयने आपण या संदर्भात बीएमसीशी बोलणार असल्याचे उत्तर दिले.
यावेळी अक्षयने आणखी अशी शौचालये बसवावीत, अशी मागणीही या व्यक्तीने केली. अक्षय आणि वृद्ध व्यक्तीच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती अक्षय कुमारला सांगतो की, अक्षयने बांधलेले टॉयलेट सडले आहे. तीन-चार वर्षांपासून स्वच्छतागृहांची देखभाल आपण करत असल्याचे या वृद्ध व्यक्तीचे म्हणणे आहे. या जेष्ठ नागरिकाचं बोलणं ऐकल्यानंतर अक्षय हसला आणि त्याने उत्तरादाखल म्हटले की, 'ठीक आहे, आपण यावर काम करूया. मी बीएमसीशी बोलणार आहे.'
मग, त्या व्यक्तीने अक्षयला सांगितले, आधीचे टॉयलेट हे लोखंडाचे आहेत, त्यामुळे ते लवकर सडतात. त्यात वेळोवेळी भरपूर पैसे खर्च करावे लागतात. यावर अक्षय उत्तर देत म्हणतो की, ‘आपण यावर नक्की बोलूया, काय करता येईल ते बघूया. महापालिकेने त्यांची काळजी घेणे अपेक्षित होते.’ यावर तो वृद्ध व्यक्ती अक्षयला सांगतो की, 'तुला डबा द्यावा लागेल, मी लावून घेऊन आणि त्यात फार काही काम नाही.' अक्षय म्हणतो, ‘मी डब्बा तर आधीच दिला आहे.’ मग तो माणूस म्हणतो, ‘तोच सडला आहे.’ यावर अक्षय म्हणतो की, ‘तो डब्बा सडला आहे, तर आता बीएमसी बघेल.’
अक्षय कुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' हा चित्रपट २०१७ मध्ये आला होता. त्यावेळी ट्विंकल खन्नाने जुहू बीचचा फोटो पोस्ट करत उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोकांकडे लक्ष वेधले होते. २०१८मध्ये अक्षय कुमारने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिळून जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर १० लाख रुपये किमतीचे बायो टॉयलेट बसवले होते. अक्षय कुमारच्या या कामाचे खूप कौतुकही झाले होते. मात्र, आता तेच टॉयलेट खराब झाल्याचे या वृद्धाने त्याच्या लक्षात आणून दिले आहे.