बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे. त्याचा 'खेल खेल में' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे तो सध्या जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या वर्षातील अक्षय कुमारचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. अक्षय हा एक उत्तम अभिनेता असण्यासोबत त्याच्या दिलदारपणसाठी विशेष ओळखला जातो. नुकताच त्याने हाजी अली दर्ग्यात पैसे दान केल्याचे समोर आले आहे.
अक्षय कुमार हा लोकांची नेहमी मदत करत असतो. अनेकदा तो लाखो-कोट्यावधी रुपये दान करताना दिसतो. नुकताच अक्षय मुंबईतील हाजी अली दर्ग्यात जाताना दिसला. तेथे हाजी अली दरगाह आणि माहिम दरगाहचे ट्रस्टी सुहैल खंडवानी अक्षय कुमारचे स्वागत करताना दिसले. दर्ग्यात प्रार्थना करतानाचा अक्षय कुमारचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. तसेच दर्ग्याच्या नुतनीकरणाची जबाबदारी अक्षयने घेतल्याचे समोर आले आहे. यासाठी अक्षयने १ कोटी २१ लाख रुपये दान केले आहेत. अक्षयचा हा दिलदारपणा पाहून अनेकांनी कौतुक केले आहे.
यापूर्वी अक्षय कुमारने त्याच्या मुंबईतील घरी भंडारा ठेवला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अक्षय कुमार भंडाऱ्यामध्ये जेवण वाढताना दिसत होता. दरम्यान, अक्षयने स्वत:चा चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याने टोपी घातली होती आणि मास्क लावला होता. तरही अनेकांनी तो अक्षय असल्याचे ओळखले. या व्हिडीच्या माध्यमातून अक्षयने सर्वांची मने जिंकली होती.
अक्षय कुमारने अयोध्ये मधील राम मंदिराच्या उभारणीच्यावेळी कोट्यवधी रुपयांची मदत केली होती. पण त्याने किती रुपये दान केले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर आता हाजी अली दर्ग्यासाठी देखील अक्षयने मदत केल्याचे समोर आले आहे.
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?
लवकरच अक्षयचा 'खेल खेल में' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. याशिवाय, त्याचे 'सिंघम अगेन', 'हेरा फेरी ३' आणि 'वेलकम टू द जंगल' हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. चाहत्यांमध्ये अक्षयच्या चित्रपटांविषयी उत्सुकता पाहायला मिळते.