देशभरात आज निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत आहे. मुंबईत होत असलेल्या या मतदानात आता कलाकार देखील सामील झाले आहेत. संपूर्ण मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्यास सांगत आहेत आणि आता काही बॉलिवूड कलाकार स्वतः मतदान करण्यासाठी मतदान पोहोचले आहेत. अक्षय कुमार, फरहान अख्तर आणि जान्हवी कपूर हे सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. एएनआयने मतदान केंद्रावर रांगेत उभ्या असलेल्या अभिनेता अक्षय कुमारचा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकी वर्षे भारतात राहूनही अक्षय कुमार पहिल्यांदाच मतदान करत आहे.
ANI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अक्षय कुमार मतदान केंद्रावर पोहोचल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयने ऑलिव्ह-ग्रीन शर्ट घातलेला दिसतो आणि तो खूपच डॅशिंग दिसत आहे. यावेळी तो रांगेत थांबलेला दिसत आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेता म्हणाला की, 'माझा भारत विकसित व्हावा आणि मजबूत व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे लक्षात घेऊन मी मतदान केले. भारतातील नागरिकांना त्यांना जे योग्य वाटेल त्यांना मतदान करावे...मला वाटते यावेळी मतदानाची टक्केवारी चांगली असेल.’
यावेळी जेव्हा अक्षयला विचारण्यात आले की, तो मतदान करण्यासाठी रांगेत का थांबला आहे?, तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले की, 'मग मी काय करू? लाइन तोडून पुढे जाऊ का?' भारतीय नागरिक म्हणून पहिले मतदान करण्याबद्दल अक्षय म्हणाला, 'मला खूप छान वाटत आहे, आश्चर्यकारक वाटते.' बोटावर मतदानाच्या शाईची खूण दाखवूनही तो गोड हसला.
गेल्या २०२३मध्ये स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारने एक मनोरंजक घोषणा करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. त्याने जाहीर केले होते की, आपण कॅनडाचे नागरिकत्व सोडले आहे आणि आता मी अधिकृतपणे भारताचा नागरिक आहे. गेल्या काही वर्षांत अक्षयचे नागरिकत्व हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता आणि यामुळे अभिनेत्यावर बरीच टीकाही झाली होती. त्याने २०१९मध्ये भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता. परंतु, कोव्हिडमुळे ही प्रक्रिया लांबली आहे. दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल अक्षय कुमार शेवटचा टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसला होता. आता तो अर्शद वारसीसोबत 'जॉली एलएलबी' फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे.