Mission Raniganj: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ आता ऑस्करमध्ये दाखवणार जलवा; निर्मात्यांची मोठी घोषणा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mission Raniganj: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ आता ऑस्करमध्ये दाखवणार जलवा; निर्मात्यांची मोठी घोषणा!

Mission Raniganj: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ आता ऑस्करमध्ये दाखवणार जलवा; निर्मात्यांची मोठी घोषणा!

Published Oct 14, 2023 08:48 AM IST

Mission Raniganj In Oscars: समीक्षक आणि चाहत्यांचे प्रेम मिळाल्यानंतर आता ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Mission Raniganj
Mission Raniganj

Mission Raniganj In Oscars: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक जीवन कथेवर आधारित हा बायोपिक आता ऑस्करमध्ये धडक मारणार आहे. समीक्षक आणि चाहत्यांचे प्रेम मिळाल्यानंतर आता या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्ताने, 'मिशन रानीगंज'च्या निर्मात्यांनी हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

आता ही केवळ अक्षय कुमार आणि त्याच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट अतिशय धाडसी कोल इंजिनीअर जसवंत गिल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. जसवंत गिल यांनी १९८९मध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या ६५ मजुरांचे प्राण वाचवले होते. आपल्या हिंमतीने आणि धाडसाने त्यांनी इतिहासात आपले नाव कोरले. या शौर्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अक्षय कुमार या चित्रपटात जसवंत गिल यांच्या भूमिकेत दिसला आहे. अक्षयसोबत या चित्रपटात परिणीती चोप्रा, रवी किशन आणि कुमुद मिश्रासारखे कलाकारही दिसले आहेत.

Ravrambha : ‘रावरंभा’ चित्रपट करताना ओम भूतकरच्या डोळ्यांत का आलं पाणी? हा किस्सा वाचाच...

दरम्यान, हा चित्रपट आता ऑस्करसाठी पाठवला जाणार असल्याचे समोर आले आहे. निर्माते स्वतंत्रपणे हा चित्रपट ऑस्करसाठी सादर करणार आहेत. या चित्रपटाला अनेक मोठ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्कर सोहळ्यात पाठवला गेला होता. ‘आरआरआर’ने देखील ऑस्करमध्ये धुमाकूळ घातला होता. ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, सध्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०२३मुळे 'मिशन रानीगंज' बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा फारसा प्रभाव दिसला नाही. त्याच्या कमाईचा वेगही आता मंदावला आहे.

‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट खूपच प्रेरणादायी आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आता हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाणार असल्याचे कळताच प्रेक्षकही आनंदी झाले आहेत. या चित्रपटाचे पुढे काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या चित्रपटाला ऑस्कर अवॉर्ड्समध्ये कोणत्या श्रेणीसाठी नामांकन दिले जाईल याबाबत आता कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Whats_app_banner