१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. अनेक कलाकारांसह राजकीय व्यक्तींनी या संमेलनात सहभाग घेतला. या नाट्यसंमेलनातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, काही कलाकारांची गैरसोय झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
पिंपरी चिंडवडमध्ये पार पडलेल्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात ज्येष्ठ कलाकारांची गैरसोय होत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "मी पुन्हा मुंबईला चालले आहे. मला एकही सभामंडप दिसलो नाही, सापडलो नाही. नाट्यसंमेलनासाठी मी नटून थटून आले होते. पण कार्यक्रमस्थळ न मिळाल्याने मी आता पुन्हा मुंबईला जात आहे."
वाचा: बस चालकाचा मुलगा कसा बनला ‘रॉकी भाई’? वाचा अभिनेता यश याच्या फिल्मीप्रवासाबद्दल....
अभिनेत्री सविता मालपेकर यांची देखील गैरसोय झाली. त्यांनी व्हिडीओ शेअर करत "नाट्यसंमेलनात सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ कलाकारांनाही बसायला जागा मिळत नसल्याने उभे राहावे लागत आहे. ज्यांना तुम्ही तुमच्या गावात बोलावता त्यांची व्यवस्था नीट करा. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. मोहन जोशी, सुरेश खरे यांचीही गैरसोय झाली" असे म्हटले.
नुकत्याच झालेल्या नाट्यपरिषद निवडणुकीत त्या निवडून ही आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत अशी गैरसोय हे फारच दुर्दैवी आहे . सविता मालपेकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सनई चौघड्यांचा मंगलमयी स्वर...लेझीम, ढोलताशांचा गजर... रांगोळ्या, पायघड्या, झब्बा-धोतर, नऊवारी साडी, फेटा असा मराठमोळा पेहराव केलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या साथीने मोरया गोसावी मंदिरा पासून शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोहोचली. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती.
नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, संदीप पाठक, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, कांचन अधिकारी, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच सुशांत शेलार, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले.