Shaitaan Trailer Release: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'शैतान’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान, त्याच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘शैतान’ या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. ‘शैतान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. जिओ स्टुडिओने देखील या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इतका हॉरर दाखवण्यात आला आहे की, तो पाहिल्यानंतर कुणाचाही थरकाप होईल. अजय देवगणनेही त्याच्या इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.
‘शैतान’ या चित्रपटाचा ट्रेलर या चित्रपटाच्या नावाला पूर्णपणे न्याय देतो. या ट्रेलरची सुरुवात व्हॉईस ओव्हरने होते की, ‘आम्ही त्याला मारून टाकू, तो जबरदस्तीने आमच्या घरात घुसला. तो माझ्या मुलीला मारेल. प्लीज तिला वाचवा.’ यानंतर आर माधवन अजय देवगणच्या घरी येतो असे दाखवण्यात आले आहे. फोन चार्ज करण्याच्या बहाण्याने तो घरात येतो. पण, यानंतर कथेला एक जबरदस्त वळण लागते. आर माधवन अजयच्या मुलीला संमोहित करतो आणि त्यानंतर अजयची मुलगी माधवन जे सांगेल तेच करते. नंतर कळते की, माधवन हा कुणी सामान्य माणूस नसून, काळ्या शक्तीच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन येणारा व्यक्ती आहे.
‘शैतान’ या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, नेटकरी देखील त्याचे कौतुक करत आहेत. ‘शैतान’ हा चित्रपट पाहण्यासाठी आता चाहतेही खूप उत्सुक आहेत. अजय देवगणचा ‘शैतान’ हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री ज्योतिका २५ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ‘डोली सजा के रखना’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते. मात्र, नंतर ती तामिळ चित्रपटांकडे वळली.
सध्या अजय देवगण प्रचंड चर्चेत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये स्पोर्ट्स ड्रामा ‘मैदान’, 'सिंघम अगेन', 'औरों में कहां दम था', 'रेड २' आणि 'साडे साती' यासारखे चित्रपट आहेत. अजयच्या या चित्रपटांच्या प्रदर्शनाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या