Ajay Devgn Blockbuster hit Movie : बॉलिवूड अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरी एक चित्रपट असा आहे जो सर्वोत्कृष्ट थ्रिलर मानला जातो. अजय देवगणच्या अभिनयापासून ते चित्रपटाच्या लेखनापर्यंत सर्वच गोष्टींचे खूप कौतुक झाले. चित्रपटाने इतका व्यवसाय केला की निर्मात्यांना नोटा मोजताना दमछाक झाली. अजय देवगणने त्याच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असले, तरी २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम २' या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड केले. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचेच मन जिंकले नाही, तर बॉक्स ऑफिसवर देखील ऐतिहासिक कमाई केली. आज, या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजय देवगणने एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अजय कुदळ घेऊन बागकाम करत असलेला दिसला आहे. त्याचा हा फोटो चित्रपटातील एका आयकॉनिक सीनची आठवण करून देतो.
‘दृश्यम २’ हा २०१५मध्ये आलेल्या हिट चित्रपट ‘दृश्यम’चा सिक्वेल आहे. या मुख्य मल्याळम सिनेमात मोहनलालने केलेली मुख्य भूमिका हिंदीत अजय देवगण याने केली होती. अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’मध्ये अजय देवगणने विजय साळगावकर यांच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली आहे. या चित्रपटात तब्बू, अक्षय खन्ना, श्रेया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि सौरभ शुक्ला यांच्यासह इतर अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.
या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्याला एक उत्कृष्ट थ्रिलर म्हणून प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘दृश्यम २’ची कथा आणि त्याचे लेखन विशेषतः यशस्वी ठरले. यामुळे चित्रपटाने चांगली लोकप्रियता आणि प्रचंड कमाई मिळवली. ‘दृश्यम २’चे बजेट अंदाजे ५० कोटी रुपये होते. मात्र, या चित्रपटाने भारतात २८२ कोटींचा आणि जागतिक स्तरावर ३४२ कोटींचा गल्ला जमा केला, ज्यामुळे तो एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट ठरला होता.
या चित्रपटातील अजय देवगणच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. त्याच्या या गुंतागुंतीच्या भूमिकेतील परफॉर्मन्सने सगळ्यांची मने जिंकली. ‘दृश्यम २’ ही एक अशा प्रकारची कथा आहे, जी प्रत्येक दृश्यामध्ये थ्रिल आणि सस्पेन्स निर्माण करते, ज्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खुर्चीला खिळून राहायला भाग पडतात. या चित्रपटामुळे अजय देवगणने एक नवीन मैलाचा टप्पा गाठला आणि त्याच्या फॅन्सची मनं पुन्हा एकदा जिंकून घेतली. आज, दोन वर्षांनी देखील ‘दृश्यम २’ हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरत आहे.