बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा 'मैदान' हा चित्रपट रिलीज होण्यासाठी आता काहीच वेळ शिल्लक आहे. अनेकदा या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्यानंतर आता खूप विलंबानंतर हा चित्रपट रिलीज होतोय. मात्र, आता रिलीजची तारीख जवळ आली असताना, हा चित्रपट पुन्हा नव्या अडचणीत अडकला आहे. कर्नाटकातील एका लेखकाने अमित शर्मा दिग्दर्शित या चित्रपटावर चोरीचा आरोप केला आहे. यानंतर म्हैसूरच्या मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायालयाने वाद मिटत नाही, तोपर्यंत अजय देवगण स्टारर चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय दिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकातील या लेखकाने या तक्रारीबद्दल बोलताना सांगितले की, 'मी २०१०मध्ये कथा लिहायला सुरुवात केली आणि २०१८ मध्ये मी त्यासंदर्भात एक पोस्टर पोस्ट केले. यानंतर, मी माझ्या लिंक्डइन पोस्टवरून एडी डायरेक्टर सुखदास सूर्यवंशी यांच्याशी करार केला. त्यांनी मला मुंबईला बोलावले आणि स्क्रिप्टही आणायला सांगितले. माझ्याकडे पूर्ण चॅट आणि मेसेजेस आहेत. त्यांनी मला सांगितले की, ते माझी आमिर खानशी ओळख करून देतील. पण, त्यावेळी काही कारणास्तव मी त्यांना भेटू शकलो नाही. मात्र, मी त्यांना कथा दिली आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशनमध्ये नोंदणी केली.’
लेखक पुढे म्हणाला की, 'मैदान हा चित्रपट येत असल्याचं नुकतंच ऐकलं. मला आश्चर्य वाटले. कारण, ही माझी कथा आहे. जेव्हा मी टीझर आणि त्यातले डायलॉग ऐकले, तेव्हा मला कळले की ही माझी कथा आहे. त्यांनी मुख्य कथा थोडी फिरवली आहे.
'मैदान'मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त प्रियमणी आणि गजराज राव मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सय्यद अब्दुल रहीम यांची कथा दाखवण्यात आली आहे, जे १९५२-१९६२ दरम्यान भारताचे फुटबॉल प्रशिक्षक होते. बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा हा चित्रपट अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सोबत ११ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट जादू दाखवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.