Aishwarya Rai Bachchan On Career: ऐश्वर्या राय बच्चन ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहे, जिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. ऐश्वर्या रायने २० एप्रिल २००७ रोजी अभिषेक बच्चनशी लग्न केले. तर, नोव्हेंबर २०११मध्ये मुलगी आराध्या बच्चनच्या जन्मानंतर तिने मातृत्व स्वीकारून, मुलीच्या संगोपनात वेळ दिला. आई झाल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आणि काही निवडक चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ऐश्वर्या तिच्या घटस्फोटाच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री पतीपासून विभक्त झाली असल्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं आहे. या दरम्यान तिचं एक जुनं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
ऐश्वर्या राय बच्चनने २०१६मध्ये रिलीज झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. रणबीर कपूरसोबतची तिची केमिस्ट्री आणि तिच्या बोल्ड अवताराने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. चाहत्यांना वाटले होते की, ऐश्वर्या पुन्हा एकदा त्यांचे मन जिंकण्यासाठी परतली आहे. परंतु, तिने रुपेरी पडद्यावरून पुन्हा गायब होऊन सर्वांची निराशा केली. असे म्हणता येईल की, ऐश्वर्याचा प्राधान्यक्रम बदलला आहे आणि आता ती पूर्णवेळ आराध्याची आई झाली आहे.
आता ऐश्वर्या राय बच्चनचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तिला एका आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत विचारण्यात आले होते की, ती पूर्णवेळ मातृत्व स्वीकारण्याचा विचार करत आहे की नाही? अभिषेक बच्चनसोबत लग्न आणि नंतर मूल झाल्यानंतर ती स्वतःला विसरून, कामाकडे दुर्लक्ष करेल का? अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी पत्रकारांनी तिला प्रश्न विचारताना म्हटले होते की, ‘आम्ही आशा करतो की, मुलं आणि लग्नामुळे आम्ही तुला गमावणार नाही.’
मात्र, यावेळी आयोजकांनी मीडियाला उद्देशून म्हटले की, ऐश्वर्याला आणखी वैयक्तिक प्रश्न विचारू नयेत. मात्र, पत्रकाराच्या प्रश्नाला अभिनेत्रीने अतिशय अभिमानाने सामोरं जात सुंदर उत्तर दिलं. ऐश्वर्याने तिच्या उत्तरात म्हटले की, ती लग्नाचा आनंद घेत आहे आणि बाळाची वाट पाहत आहे. ती म्हणाली होती, ‘मी मुल होण्याची वाट पाहत आहे, मी सध्या लग्नाचा आनंद घेत आहे. यात स्वतःला विसरण्याचा किंवा हरवण्याचा प्रश्नच येत नाही.’ ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासाठी एक आदर्श आई आहे. अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांनीही आई म्हणून ऐश्वर्या राय बच्चनचे कौतुक केले आहे.