Abhishek Bachchan Birthday: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज (५ फेब्रुवारी) त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून अभिषेक बच्चन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण, या खास दिवशी त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हिने देखील पती अभिषेकसाठी खास पोस्ट लिहिली आहे. यासोबतच तिने त्यांचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे.
अभिषेक बच्चनच्या वाढदिवशी त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हिने पतीला शुभेच्छा दिल्याने आता तिच्या आणि अभिषेकच्या नात्यात फुट पडल्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. बच्चन कुटुंबातील अनेक सदस्यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर करून अभिषेक बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन ते बहीण श्वेता बच्चन आणि भाची नव्या नवेली नंदा यांनी देखील अभिषेकसाठी खास बर्थडे पोस्ट्स केल्या आहेत.
अभिनेता अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसानिमित्त वडील अमिताभ बच्चन यांनी त्याला हटके पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'अभिषेक, भय्यू.. तू सर्वोत्तम आहेस.. तुझी विविधता, तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझा प्रामाणिकपणा.. कधीही वाया जाणार नाही.. कधीच नाही!! माझे चिरंतन प्रेम.. वर्ष नव, हर्ष नव; जीवन उत्कर्ष नव’
श्वेता बच्चननेही भाऊ अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. तिने स्वतःचा आणि अभिषेकचा बालपणीचा एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबत तिने लिहिले की, 'असे नाही - जर तुम्हाला माहित असेल आणि तुम्हाला माहित असेल तर, ते फक्त तुम्हीच जाणता आणि मला माहीत आहे. माझ्या लहान भावाचा आज खूप मोठा दिवस आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’
या सगळ्यादरम्यान ऐश्वर्या राय-बच्चनची अभिषेकसाठी ही खास पोस्ट या दोघांच्या नात्यात फूट पडल्याच्या चर्चेला पूर्णविराम देणारी ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या. मात्र, या चर्चांदरम्यान दोघे अनेकदा एकत्र दिसल्याने या अफवा असल्याची म्हटले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.