Lucky Bhaskar OTT Release : साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता दुलकर सलमानचा नवीन चित्रपट ‘लकी भास्कर’ आज २८ नोव्हेंबर रोजी ओटीटी' प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. दुलकर सलमानसोबत या चित्रपटात मीनाक्षी चौधरी ही अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून, लोक सोशल मीडियावर चित्रपटाकहा रिव्ह्यू शेअर करत आहेत. दुलकर सलमानच्या या चित्रपटात एका सामान्य माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. सगळ्या प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आवडली आहे. थरार आणि घोटाळ्याशी संबंधित चित्रपटाची थीम प्रेक्षकांना खूप आकर्षित करत आहे. हा चित्रपट आता तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना तो आपापल्या भाषांमध्ये पाहता येणार आहे.
‘लकी भास्कर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता आणि समीक्षकांकडूनही त्याला प्रशंसा मिळाली होती. आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे, त्याला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया युजर या चित्रपटाबद्दल भरभरून लिहिताना दिसत आहेत. ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळणार, असे चित्र दिसत आहे.
दुलकर सलमान आणि मीनाक्षी चौधरी यांची मुख्य भूमिका असलेला 'लकी भास्कर' हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत भारतात ८० कोटींहून अधिक कमाई केली. तेलुगू चित्रपटसृष्टीत धमाकेदार कमाई करणार दुलकर सलमानचा हा तिसरा चित्रपट होता. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने एकूण १०७ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.
अभिनेता दुलकर सलमानने २०१८मध्ये तेलुगू चित्रपटात पदार्पण केले, जेव्हा त्याने चित्रपटामध्ये जेमिनी गणेशनची भूमिका केली होती. या चित्रपटाची निर्मिती नाग अश्विनने केली होती, ज्यामध्ये कीर्ती सुरेशने प्रसिद्ध अभिनेत्री सावित्रीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्याही भूमिका होत्या. यानंतर, २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला दुलकरचा दुसरा चित्रपट ‘सीतारामम’ हिट झाला आणि त्यात मृणाल ठाकूर देखील होती. दुलकर सलमान लवकरच सुधा कोंगारा दिग्दर्शित सूर्याच्या नवीन चित्रपटात दिसणार आहे.