Saif Ali Khan Police Protection : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री उशिरा हल्ला झाला होता. चोरट्याने घरात घुसून अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले होते. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. सैफही दोन शस्त्रक्रिया करून घरी परतला आहे. या हल्ल्याने सैफ आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण खान कुटुंब सध्या चिंतेत असून, घरात भीतीचं वातावरण आहे.
आरोपीनी ज्या सहजतेने सैफच्या घरात प्रवेश केला आणि त्यांचा मुलगा जेहच्या खोलीत प्रवेश केला, त्यामुळे सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी सैफच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली आहे. अभिनेत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर कुटुंबाला पोलिस सुरक्षा कवच देण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर कुटुंबीय घाबरले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. या दाम्पत्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. सैफ आणि करीनासाथी प्रत्येक दोन पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
१६ जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर बांगलादेशातील रहिवासी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याने चाकूने हल्ला केला होता. चोरीच्या उद्देशाने तो घरात घुसला होता. यावेळी सैफ अली खानला जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अभिनेत्याच्या पाठीच्या कण्याजवळून २.५ इंच चाकूचा तुकडा काढण्यात आला. डॉक्टरांनी सांगितले होते की, अभिनेता मुलगा तैमूरसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. तो रक्ताने माखलेला होता, पण सिंहासारखा स्वतःहून हॉस्पिटलमध्ये आला. सैफ तैमूर आणि अन्य सदस्यासोबत ऑटोमधून लीलावती येथे पोहोचला होता. डिस्चार्ज करण्यापूर्वी अभिनेत्याने ऑटो चालक भजन सिंह राणा यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदतही केली. मिळालेल्या बक्षीसाची रक्कम सांगण्यास चालकाने नकार दिला.
शरीफुलने सातव्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या मजल्यावर सैफ आपल्या कुटुंबासह राहतो. त्यानंतर डक्ट एरियात घुसून पाईपच्या साहाय्याने तो बाराव्या मजल्यावर गेला. आरोपीने बाथरूमच्या खिडकीतून अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि थेट जेहच्या खोलीत गेला. शरीफुलला पाहताच सैफची महिला स्टाफ मेंबर ओरडली. त्यानंतर सैफ-करीना तेथे पोहोचले. सैफ आणि आरोपीमध्ये बाचाबाची झाली, यादरम्यान त्याने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला होता.
संबंधित बातम्या