मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘प्रेक्षकांनी पाठ फिरवली म्हणूनच...’, 'पृथ्वीराज' आपटल्यावर अक्षयचा मोठा निर्णय

‘प्रेक्षकांनी पाठ फिरवली म्हणूनच...’, 'पृथ्वीराज' आपटल्यावर अक्षयचा मोठा निर्णय

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 14, 2022 07:06 PM IST

(akshay kumar)३०० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने ६२ कोटींची कमाई करणं फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याचा परिणाम अक्षयच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूवरही दिसून येतोय.

अक्षय कुमार
अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(akshay kumar) याचा 'पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकलेला नाही. प्रदर्शनाच्या ११ दिवसातच हा चित्रपट गुंडाळायची वेळ निर्मात्यांवर आली आहे. काही केल्या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढत नसल्याचं पाहून सिनेमागृह चालकांनी चित्रपटाचे शो रद्द केले. ११ दिवसात या चित्रपटाने केवळ ६२ कोटींची कमाई केली आहे. ३०० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने ६२ कोटींची कमाई करणं फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याचा परिणाम अक्षयच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूवरही दिसून येतोय. मात्र हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अक्षयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

'पृथ्वीराज' चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी एका मुलाखतीत अक्षयच्या या निर्णयाबद्दल सांगितलं आहे. हा चित्रपट जर फ्लॉप झाला तर आपण यापुढे असे चित्रपट करणार नसल्याचं अक्षयने त्यांना म्हटलं होतं. जर हा चित्रपट चालला नाही तर तो पुन्हा 'रावडी राठोड', 'हाउसफुल' सारखे चित्रपटच करेल असं अक्षयने म्हटलं होतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत द्विवेदी म्हणाले, 'अक्षय मला म्हणाला होता की, जेव्हा एखादा चित्रपट अयशस्वी ठरतो तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान निर्मात्याचं होतं. त्याला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. हा चित्रपट यशराज बॅनर अंतर्गत बनलेला मोठा ऐतिहासिक सिनेमा होता. जर चित्रपट चालला तर यशराज आणखी चित्रपट बनवतील पण जर नाही चालला तर ते देखील पुन्हा असे चित्रपट बनवून स्वतःच नुकसान का करून घेतील?'

पुढे द्विवेदी म्हणाले, 'अक्षय मला खाजगीत म्हणाला होता की, मी 'रावडी राठोड', 'हाऊसफुल' सारख्या चित्रपटात काम केलंय. त्या चित्रपटांमध्ये जास्त पैसे मिळतात. 'पृथ्वीराज' हा मी केलेला एक प्रयत्न होता. जर लोकांना तो आवडला तर मी आणखी असे चित्रपट करेन पण जर नाही आवडला तर मी असे चित्रपट करणार नाही. मी पुन्हा बॉलिवूडचे मसाला असलेले चित्रपट करेन.' आता खरंच या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. आता चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याच्या पुढील चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरेल.

WhatsApp channel