छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपूर्वी ऑफ एअर गेला आहे. मात्र या कार्यक्रमाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. गेली दहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचा भरभरून मनोरंजन करत होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. मात्र, सध्याच्या काळात टीआरपी मिळत नसल्याने या शोला बंद करणंच योग्य समजलं गेलं. मात्र, हा कथाबाह्य कार्यक्रम बंद होण्यापूर्वीच काही कलाकारांनी या शोला रामराम ठोकला होता. यानंतर आता हेच कलाकार हिंदी मनोरंजन विश्व गाजवताना दिसत आहेत. ‘मॅडनेस माचायेंगे’ या शोमध्ये आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता सागर कारंडे याची एन्ट्री झाली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमात भाऊ कदम, निलेश साबळे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे या कलाकारांनी आपल्या विनोदी अभिनेयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. हा कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल डोस होता. मात्र, आता यातील सगळेच कलाकार वेगवेगळ्या मंचावर आपली कला सादर करताना दिसत आहेत. एकीकडे निलेश साबळे याने त्याचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ नावाचा एक नवा कार्यक्रम सुरू केला. यामध्ये भाऊ कदम आणि ओंकार भोजने त्याची साथ देताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे हेमांगी कवी, कुशल बद्रिके, गौरव मोरे यांसारखे कलाकार हिंदीत आपलं नाव गाजवत आहेत.
हिंदीतील छोट्या पडद्यावर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘मॅडनेस माचायेंगे’ हा शो सध्या चांगलाच गाजत आहे. ‘मॅडनेस माचायेंगे’ हा शो हिंदी असला, तरी यामध्ये सगळेच मराठी कलाकार आपल्या विनोदाची जादू दाखवताना दिसत आहेत. सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांनी एन्ट्री घेतली होती. यानंतर गौरव मोरेने देखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाला रामराम म्हणत ‘मॅडनेस मचायेंगे’चा रस्ता धरला. मराठी मनोरंजन विश्वातील हे तीन मातब्बर विनोदी कलाकार महाराष्ट्राच्या हिंदी प्रेक्षकांना हसवत असताना आता प्रेक्षकांना आणखी एक धमाल सरप्राईज मिळालं आहे.
या कार्यक्रमात आता अभिनेता सागर कारंडे याची देखील एन्ट्री झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर सागर कारंडे मधल्या काळात फारसा दिसला नव्हता. ‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमात सागर कारंडेने ‘पोस्टमन काका’ बनवून नेहमी सगळ्यांना हसवलं आणि हसवता हसवता डोळ्यात पाणी देखील आणलं. आता तो ‘मॅडनेस माचायेंगे’ या कार्यक्रमातून तो हिंदी प्रेक्षकांना देखील पोट धरून हसायला लावणार आहे.