No Meat an Alcohol In Diljit Dosanjh Concert : प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याने नुकताच मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक मोठा म्युझिक कॉन्सर्ट केला. मात्र, हा शो व्हायच्या एक दिवस आधी, बजरंग दलाने इंदूरच्या कॉन्सर्टमध्ये मांस आणि मद्यविक्रीला जोरदार विरोध केला होता. इंदूरमध्ये हा शो होऊ देण्यासाठी बजरंग दलाने काही अटी ठेवल्या होत्या. इतकंच नाही तर, या गोष्टी पाळल्या गेल्या नाही तर, ही मैफल होऊ देणार नाही असे देखील सांगण्यात आले होते. या धमकीवजा इशाऱ्यानंतर दिलजीतची धमकेदार मैफल सुरूच झाली आणि त्याने एकामागून एक उत्कृष्ट परफॉर्मन्स दिले.
मात्र, दिलजीतने यावेळी बजरंग दलाच्या प्रत्येक अटीची पूर्तता केली. बजरंग दलाच्या माणीनुसार, कॉन्सर्टच्या ठिकाणी दारू किंवा मांस विकले गेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलजीतच्या इंदूर कॉन्सर्टमध्ये कोणतेही मांस किंवा मद्य दिले गेले नाही किंवा समाजावर वाईट परिणाम होईल, अशी कोणतीही कृती होताना दिसली नाही. याअंतर्गत कार्यक्रम वेळेवर आटोपल्यानंतर बजरंग दलाने आंदोलन संपवून मागणी पूर्ण केल्याबद्दल प्रशासनाचे आभार देखील मानले.
बजरंग दलाने शनिवारी इंदूरमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचा निषेध केला. विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) सदस्य यश बचानी यांनी आधीच इशारा दिल होता की, बजरंग दल या मैफिलीचा निषेध करण्यासाठी आणि मांस आणि मद्य देण्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरू शकतो.अतिरिक्त पोलीस उपायुक्त (डीसीपी) अमरेंद्र सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि सांगितले की, ‘इंदूर पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेत आहेत. इंदूर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था, महिला सुरक्षा आणि अंमली पदार्थांचे सेवन या समस्यांना अतिशय गांभीर्याने हाताळत आहेत. आम्ही येथे कुणालाही उघड्यावर दारू पिण्यास आणि धूम्रपान करण्यास परवानगी दिलेली नाही. आम्ही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊ.’
याआधी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिन्यात पुण्यातील कोथरूड परिसरात पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दारू पिण्याची परवानगी रद्द केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवा शाखा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, तसेच काही स्थानिक रहिवासी आणि संघटनांनी या कार्यक्रमात दारू देण्यास तीव्र विरोध केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या