Adnan Sami Mother Passed Away:लोकप्रिय गायक अदनान सामी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अदनानच्या आईचे निधन झाले आहे. त्या ७७ वर्षांच्या होत्या. स्वतः अदनानने ही दु:खद बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अदनानने आपल्या आईचा फोटो शेअर करत एक भावनिक नोट लिहिली आहे. या फोटोमध्ये त्यांची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख लिहिलेली आहे. मात्र,त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अदनानने आपल्या आईचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘मला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, माझी लाडकी आई बेगम नौरीन सामी खान यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. माझी आई एक महान स्त्री होती. तिने नेहमी सगळ्यांना भरपूर प्रेम आणि आनंद दिला होता. आम्हाला तिची खूप आठवण येईल. तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा. अल्लाह आमच्या प्रिय आईला जन्नत-उल-मध्ये जागा देवो! फिरदौस...आमेन.’
अदनान खानची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अदनानचं या कठीण काळात सांत्वन करत आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'ओम शांती..देव तुम्हाला या दु:खातून सावरण्याची संधी देवो.’ दुसऱ्याने लिहिले की, 'तुमच्या कुटुंबियांच्या या दुःखात आम्हीही सामील आहोत.’ तर, आणखी एकाने लिहिले की, 'तुमच्या आईला स्वर्गात सर्वोच्च स्थान प्राप्त होवो.'कलाकारही गायक अदनानही सामीचे सांत्वन करत आहेत. या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना मिमी माथूरने लिहिले की, 'प्रिय अदनान,रोया आणि मदिना,तुमच्या या दुःखद बातमीमुळे मला खूप वाईट वाटले आहे. मी या कठीण काळात तुमच्या कुटुंबासोबत आहे. बाकीच्या चाहत्यांनी'रेस्ट इन पीस'आणि'ओम शांती'अशी प्रतिक्रिया दिली आहे. गायक राघवने लिहिले, ‘अल्लाह त्यांना स्वर्गात सर्वोत्तम स्थान देवो. आई गमावण्यापेक्षा मोठे दु:ख कोणतेही नाही. अल्लाह तुम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.’
अदनान सामीचा जन्म १५ ऑगस्ट १९७१ रोजी लंडनमध्ये झाला आणि तो तिथेच लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील अर्शद सामी खान हे पाकिस्तानचे होते, तर आई नौरीन खान जम्मूची होती. अदनानचे वडील पाकिस्तानी हवाई दलात पायलट होते आणि नंतर ते १४ देशांमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ सरकारी अधिकारी बनले. अदनानने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. बजरंगी भाईजानच्या'भर दो झोली मेरी'या गाण्याला त्याने आपला सुमधुर आवाज दिला होता.
संबंधित बातम्या