Aditya Narayan Viral Video: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण हा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गायनाच्या क्षेत्रात नाव कमावत आहे. गायक असण्यासोबतच आदित्य नारायण हा सूत्रसंचालक देखील आहे. आदित्य नारायण याने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान, आता आदित्य नारायण याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य भिलाई येथील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान त्याच्या चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसला आहे. आता या प्रकरणानंतर आता त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतील संपूर्ण घटना छत्तीसगडमधील एका कॉलेजमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडली आहे. आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये आयोजित कॉन्सर्टमध्ये पर्फोर्म करण्यासाठी गेला होता. आदित्यचा व्हायरल झालेला व्हिडीओ या कॉन्सर्टमधला आहे. या कार्यक्रमाला अनेक संगीतप्रेमी उपस्थित होते. यादरम्यान आदित्य शाहरुख खानच्या 'डॉन' चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. तर, आदित्यला प्रत्यक्ष गाताना पाहून चाहते खूप आनंदी आणि उत्साहित दिसत होते. पण, याच वेळी आदित्य नारायणचा संयम सुटला.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक चाहता आदित्यचा परफॉर्मन्स आपल्या फोनवर रेकॉर्ड करत होता, यावेळी आदित्यचं त्या चाहत्याकडे लक्ष गेलं आणि तो खूप संतापला. यावेळी आदित्यने आधी त्याच्या हातावर माईक मारला आणि नंतर त्याचा फोन हिसकावून फेकून दिला. आदित्य नारायणचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. त्याच्या या कृत्यावर बरीच टीका होत आहे.
एका यूजरने लिहिले की, 'आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? एवढा अभिमान कसला? आपल्याच चाहत्यांचा इतका अनादर?’ दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, 'हा स्वतःला समजतो कोण?' एकाने लिहिले की, 'स्टार असल्याचा एवढा अभिमान असेल तर घरी बसा'. ‘ही काय वागण्याची पद्धत झाली का?’, ‘याला कुणी विचारात नाही आणि हा यांचा अहंपणा...’ ‘याला बॉयकॉट करा’ आणि ‘याला आता भावच देऊ नका’ अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत.