गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मग ते सामाजिक विषय असोत वा विनोदी अतिशय वेगळे चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये बनवले जात आहेत. आता मराठीमध्ये पहिल्यांदाच एक प्रयोग होणार आहे. शक्तिमान या सुपरहिरोचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
९०च्या दशकात दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून ‘शक्तिमान’ पाहिली जायची. त्या काळात शक्तिमान या पहिल्या इंडियन सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर राज्य केले होते. अनेक लहान मुलांनी तर शक्तिमान प्रमाणे उडण्याचा देखील प्रयत्न केला होता. आता "शक्तिमान" नावाचा एक चित्रपट मराठीमध्ये येतोय. पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळा प्रयोग होताना दिसत आहे. आता या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार जाणून घेऊया...
वाचा: 'तुला पाहाते रे'नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित
मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी ‘शक्तिमान’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत बालकलाकार ईशान कुंटे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. “शक्तिमान“ चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे आपल्याला काय नवा संदेश देणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातील बालकलाकार ईशान कुंटे याचे चित्रपटातील पदार्पण असून हा दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे चित्रपट शूट होत असताना केवळ तो ६ वर्षांचा होता .
वाचा: अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या मराठी चित्रपटाचा डंका, शंभर शोज झाले हाऊसफुल
हा नक्की कोणत्या धाटणीचा चित्रपट आहे हे अजूनही समजले नाही. मात्र पोस्टरवर मनमुराद हसणारं कुटुंब आणि "बाबा, तू होऊ शकतोस सुपरहिरो?" या टॅगलाईनने चित्रपटाच्या कथानकाविषयी प्रेक्षकांचे कुतूहल वाढवले आहे. एक हसमुख कुटुंब आणि आदिनाथ ने घातलेला सुपरहिरोचा लाल रंगाचा क्रेप यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे हे नक्की . हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
वाचा: कुटुंबाच्या विरोधात जाऊन विजय देवरकोंडाने केले अभिनय क्षेत्रात करिअर, काय होते कारण?