काही कार्यक्रम असे असतात जे गाजतात त्यांची चर्चा होते, पण काही कार्यक्रम असेही असतात ज्याची चर्चा तर होतेच सोबतच हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनतात, ओळख बनतात आणि मनात घर करून राहतात. असाच २० वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम. याची चर्चाही झाली, या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घरदेखील केलं आणि अनेक कुटुंबाना आनंद व आधारही दिला.
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यातून घरातील प्रत्येक माऊली आदेश बांदेकरांना आपल्या कुटुंबाचा एक भाग मानू लागली. 'दार उघड बये दार उघड' म्हणत १३ सप्टेंबर २००४ रोजी सुरु झालेला ६ भागांचा हा प्रवास १३ सप्टेंबर २०२४ ला २० वर्ष पूर्ण करत आहे. 'होम मिनिस्टर' ने केवळ मनोरंजनच केले नाही तर अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे, अनेक कुटुंबाना सुखद अनुभव या कार्यक्रमाने दिला. अनेक कुटुंबांमधली सुख दुःख वाटून घेतली.
‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम मराठी टेलिव्हिजनवर एक मैलाचा दगड ठरत आहे. या कार्यक्रमाने आतापर्यंत जवळपास १५ लाख किलोमीटरचा प्रवास केलाय, ६५०० पेक्षा जास्त भाग प्रक्षेपित झाले असून आदेश भाऊजींनी जवळपास ६ लाख कुटुबांसोबत थेटभेट देत त्या कुटुंबातले सुख दुःख वाटून घेतले. विशेष म्हणजे कोविड काळातही हा कार्यक्रम सुरु होता जेव्हा सगळं जग लॉकडाऊनमध्ये होत तेव्हा देखील आदेश भाऊजी होम मिनिस्टर घरच्या घरीच्या माध्यमातून ऑनलाईन वहिनींशी संवाद साधत होते. हा त्या वहिनींसाठी आणि त्या कुटुंबासाठी त्या कठीण काळात मनोरंजनाचा एक आधार होता.
होम मिनिस्टरची आतापर्यंत जवळपास २० पर्व झाली, त्यातली काही गाजलेली पर्व म्हणजेच भारत दौरा, महाराष्ट्र दौरा, स्वप्न गृहलक्ष्मीचे, होणार सून मी ह्या घरची, नववधू नं १, जाऊबाई जोरात, काहे दिया परदेस, अग्गबाई सुनबाई, पैठणी माहेरच्या अंगणी, होम मिनिस्टर घरच्या घरी, कोविड योद्धा विशेष आणि नुकतंच पार पडलेलं ‘महामिनिस्टरचं’ पर्व ज्यात विजेत्या वहिनींना मिळाली ११ लाखांची सोन्याची जर असलेली पैठणी आणि ती पैठणी विणली गेली होती अपंग मुलामुलींकडून.
वाचा: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?
या कार्यक्रमाने इतका मोठा टप्पा गाठल्याबद्दल भावुक होत आदेश बांदेकर म्हणाले, "२० वर्ष आनंदाची होती, झी मराठीच्या माध्यमातून २० वर्षात साधारण ६५०० भाग, अंदाजे ६ लाख २२५० कुटुबांसोबत थेट संवाद साधता आला, विविध कार्यक्रमांमधून ६० लाख प्रेक्षकांना आनंद देता आला. या प्रवासात अनेक कुटुंबाना आणि माऊलींना भेटत असताना त्यांचा चेहेऱ्यावरील समाधान ऊर्जा देत होत आणि अजूनही अनेक कुटुंब ‘होम मिनिस्टरची’ वाट बघत आहेत. २० वर्षाच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची तेव्हा आज्ञा असावी.”