छोट्या पडद्यावर गाजणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. तब्बल दोन-अडीच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारी तेजश्री प्रधान अल्पावधीतच पुन्हा प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेपासून सुरू झालेला तेजश्री प्रधान हिचा हा प्रवास आता ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेपर्यंत येऊन पोहोचलाय. तेजश्री प्रधानसाठी हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर परतत असताना एकीकडे तेजश्रीला आनंद तर होताच. मात्र, दुसरीकडे तिच्यावरचं मातृछत्र हरपलं होतं, याचं अतीव दुःख देखील होतं. मात्र, या सगळ्यातून तेजश्रीने स्वतःला खूप खंबीर बनवलं आणि ती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली. मात्र, आता आईच्या आठवणीत भावूक झालेल्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजश्री प्रधान हिच्या आईचं गेल्या सहा महिन्यापूर्वी निधन झालं. आज तेजश्रीच्या आईला जाऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. याच प्रसंगी तेजश्री प्रधान हिने तिच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तेजश्री प्रधान एक पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. तर, तिची आई तिच्या पाठीशी उभी राहून कौतुकाने आपल्या लेकीकडे बघताना दिसत आहे. आईसोबतचा हा फोटो पोस्ट करताना तेजश्री प्रधान हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आई सहा महिने झाले... पाठीशी आहेस ना अशीच! रहा... कायम!’
या फोटोमध्ये जणू तेजश्री प्रधान हिची आई आपल्या लेकीला आणि तिच्या कामाला प्रोत्साहन देतेय, असंच वाटत आहे. तेजश्री प्रधान हिने या फोटोला दिलेलं हे कॅप्शन देखील प्रेक्षकांच्या आणि तिच्या चाहत्यांच्या मनाला भावलं आहे. तेजश्रीच्या या पोस्टवर तिचे चाहते कमेंट करून अभिनेत्रीचं सांत्वन करताना दिसत आहेत. तेजश्रीच्या आईला जाऊन आज सहा महिने झाले आहेत. सहा महिन्यांपासून आईविना असलेली तेजश्री आता या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
या सगळ्यातच ती प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करत आहे. आपल्या दुःखाचा आपल्या कामावर कोणताही परिणाम होऊ न देता तेजश्री प्रधान आपल्या मालिकेतून सगळ्यांच्याच भेटीला येते. प्रेक्षक तिच्या याच खंबीर मनाचं कौतुक करत आहेत. तेजश्री प्रधान हिच्या आई सीमा प्रधान यांचं गेल्या सहा महिन्यांपूर्वी निधन झालं. सीमा प्रधान या बऱ्याच दिवसापासून आजारी होत्या. १६ नोव्हेंबर रोजी राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या जाण्यानं तेजश्री प्रधानवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, आता अभिनेत्री या सगळ्यातून हळूहळू सावरत आहे.