Shruti Marathe casting Couch: मनोरंजन विश्व बाहेरून कितीही झगमगाटी दिसत असलं तर, आतील वास्तव आणि काळं सत्य हे केवळ त्यात वावरणाऱ्या लोकांनाच ठावूक असतं. कास्टिंग काऊच हा देखील या काळ्या सत्याचाच एक भाग आहे. याचा अनुभव अनेकदा कलाकार मंडळी शेअर करताना दिसतात. मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे हिला देखील करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. नुकत्याच एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला आहे.
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे हिने नुकतीच ‘आरपार’ या पोर्टलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचची आपबिती सांगितली आहे. यावेळी आपबिती सांगताना श्रुती मराठे म्हणाली की, ‘बऱ्याच वर्षांपूर्वी मलाही मराठी इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. त्यावेळी मी अगदीच नवीन होते असंही नव्हतं. काही वर्ष आधीपासूनच मी मनोरंजन विश्वात सक्रिय होते. मात्र, तरीही मला या गोष्टीला सामोरं जावं लागलं.’
पुढे श्रुती मराठे म्हणाली की, ‘अभिनेत्री उपलब्ध असतात, हे कुणी सुरू केलं आणि कुठून सुरू झालं असावं कळत नाही. हे शब्द ऐकायलाच खूप घाण वाटतात. कुठून सुरू झाला असेल हा घाण प्रकार? अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं हे कुणी ठरवलं?’ यावेळी एक किस्सा सांगताना श्रुती म्हणाली की, ‘मी एका चित्रपटाच्या निमित्ताने मी एका फायनान्सरला भेटले होते. चित्रपटाचं सगळं ठरलं. मग मानधनाची बोलणी सुरू झाली. मी माझी फीस किती असतील ते त्यांना सांगितलं. मात्र, त्यावर त्यांनी जे म्हटलं ते ऐकून मी गोंधळून गेले.’
या फायनान्सरने श्रुतीला म्हटलं की, मी सांगेन ते माझ्यासोबत करशील तर तुला हवे तितके मानधन मिळेल. हे ऐकून श्रुती मराठे चांगलीच संतापली होती. तिने या व्यक्तीला सडेतोड उत्तर देत म्हटले की, ‘मी जर तुमच्यासोबत झोपले तर, तुमची पत्नी फिल्मच्या अभिनेत्यासोबत झोपणार का?’ श्रुतीचं हे उत्तर ऐकून तो व्यक्ती देखील चांगलाच हडबडून गेला होता. यांनतर श्रुतीने देखील त्याला चांगलंच फैलावर घेतलं.