एकेकाळी #Metoo चळवळ प्रचंड चर्चेत होती. मीटू चळवळी दरम्यान एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील अनेक नामांकित व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. दरम्यान, आता हेमा समितीचा अहवाल समोर आल्यापासून मल्याळम, तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत लैंगिक छळ आणि शोषणाचे धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. एकापाठोपाठ एक अभिनेत्री समोर येऊन आपल्यासोबत झालेल्या लैंगिक छळाबाबत धक्कादायक दावे करत आहेत. दरम्यान, आता टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेही या यादीत सामील झाली आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका हिंदी चित्रपट निर्मात्याने तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप शिल्पा शिंदेने केला आहे.
'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून चर्चेत आलेल्या शिल्पा शिंदेने नुकतीच एक मुलाखत दिली. या दरम्यान शिल्पाने संभाषणात एक अतिशय धक्कादायक दावा केला आहे. एकदा ऑडिशनच्या नावाखाली तिला एका चित्रपट निर्मात्याला लैंगिकदृष्ट्या आकर्षित करण्यास सांगण्यात आले होते, असे तिने सांगितले.
शिल्पा म्हणाली की, '१९९८-९९च्या सुमारास मी संघर्ष करत होते. मी नाव घेऊ शकत नाही, पण तो मला म्हणाला, 'तू हे कपडे घालून हा सीन कर'. पण मी ते कपडे घातले नाहीत. सीनमध्ये त्याने मला सांगितले की, तो माझा बॉस आहे आणि मला त्याला आकर्षित करायचे आहे. तेव्हा मी खूप निष्पाप होते आणि त्यांचा हेतू समजू शकत नव्हते. म्हणूनच मी तो सीन केला. पण त्या व्यक्तीने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मी खूप घाबरले. त्यावेळी' मी त्याला ढकलून पळून गेलो. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच मला तिथून निघून जाण्यास सांगितले. त्यांना वाटले की मी गोंधळ घालेन आणि मदतीसाठी आरडाओरडा करेन.'
बिग बॉस विजेती शिल्पा शिंदे हिने मात्र त्या निर्मात्याचे नाव जाहीर केले नाही. हा निर्माता हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती होता, असे ती म्हणाली. शिल्पा म्हणाली की, ‘मी तो सीन करायला तयार झालो कारण तोही एक अभिनेता होता. मी अजिबात खोटं बोलत नाहीय. पण, आता त्यांचं नाव सांगू शकत नाही. त्यांची मुलं कदाचित माझ्यापेक्षा थोडी लहान असतील आणि मी आता त्याचा उल्लेख केला, तर मुलांनाही त्रास होईल. काही वर्षांनंतर मी त्यांना पुन्हा भेटले होते. त्यावेळी ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलले. त्यांनी मला ओळखलं नाही. त्यांनी मला एका चित्रपटात काम करण्याची ऑफरही दिली. पण मी नकार दिला.’