मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मृणाल दुसानीसने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिची कोणतीही भूमिका असो, प्रेक्षकांनी मात्र ती तितकीच डोक्यावर उचलून घेतली. नेहमी सालस, साधी आणि सरळ अशी सून साकारणारी मृणाल दुसानीस खऱ्या आयुष्यात देखील लग्न करून परदेशात स्थायिक झाली आहे. मात्र, काहीच दिवसांपूर्वी मृणाल भारत भेटीवर आली होती. त्यादरम्यान अनेक माध्यमांनी तिच्याशी संपर्क साधला. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेनंतर मृणाल दुसानीस ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’, ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’ अशा अनेक मालिकांमध्ये झळकली. तिच्या प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली होती. ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ ही तिची शेवटची मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
या मालिके नंतर अभिनेत्री लग्नबंधनात अडकली. इतकंच नाही, तर तिने परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेत सगळ्यांनाच धक्का दिला होता. परदेशात स्थायिक झालेली मृणाल कुटुंबासोबत संसारात रममाण झाली आहे. मात्र, तिची शेवटची मालिका अर्थात ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ ही मध्यातच बंद पडली होती. या मालिकेच्या दरम्यान अनेक कलाकारांनी मालिकेचा निर्माता मंदार देवस्थळी याच्यावर आरोप केले होते. ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका मंदार देवस्थळी यांनी निर्मित केली होती. मात्र, कलाकारांचे पैसे वेळेवर न देणे आणि कलाकारांचे पैसे बुडवणे यामुळे ही मालिका अतिशय चर्चेत आली होती. ही मालिका ऑफ एअर गेल्यानंतर देखील मालिकेतील कलाकारांनी पोस्ट करत निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते.
शशांक केतकरने देखील लढा देऊन आपले पैसे परत मिळवले. मात्र, त्याचे पैसे मिळाले, पण टीडीएस बुडाला. तर, दुसरीकडे मृणाल दुसानीस हिला या मालिकेसाठी काहीही पैसे मिळालेच नाहीत. अर्थात तिचे पैसे पूर्ण बुडून गेले. याविषयी मृणालने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. मृणाल दुसानीस म्हणाली की, ‘ही मालिका माझ्यासाठी नेहमी लक्षात राहील अशी होती. ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका सुरू असताना माझ्या वडिलांची तब्येत खूप बिघडली होती. मात्र, त्यांना वेळही देता येत नव्हता. मालिकेच्या सततच्या शूटिंगमुळे मी माझ्या वडिलांसोबत देखील राहू शकले नाही. इतकी मेहनत, इतके कष्ट घेऊन सुद्धा या मालिकेचे पैसे मला मिळालेच नाहीत. एखाद्या विषयी वादग्रस्त पोस्ट लिहिणे किंवा ती शेअर करणे हा मुळातच माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी शांत राहणं पसंत केलं होतं. मात्र, मनातून या गोष्टीचं फार दुःख झालं होतं.
मृणाल पुढे म्हणाली की, ‘मंदार देवस्थळी दिग्दर्शक म्हणून खूप चांगला आहे. मात्र, निर्माता म्हणून तो अतिशय वाईट आहे. ही मालिका स्वीकारण्यापूर्वी अनेकांनी मला यासंदर्भात कल्पना दिली होती. मात्र, कथानक आवडलं म्हणून मी ही मालिका करण्याचं ठरवलं होतं. शशांकला त्याचे पैसे परत मिळाले. मात्र, त्यावरचा टीडीएस अजूनही मिळालेला नाही. मला या मालिकेसाठी पैसेच मिळाले नाहीत. एकीकडे माझ्या वडिलांचं आजारपण आणि दुसरीकडे ही मालिका असं दुहेरी आव्हान त्यावेळेस पेलत होते. मात्र, माझ्या पदरी उपेक्षाच पडली.’ मालिकेच्या इतक्या वर्षानंतर मृणाल दुसनीस हिने केलेलं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.