Actress Mallika Rajput Death: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासोबत चित्रपटात झळकलेली सहाय्यक अभिनेत्री मल्लिका राजपूत हिचे निधन झाले आहे. अभिनेत्री मल्लिका राजपूत हिने आत्महत्या केली आहे. मल्लिकाचा मृतदेह तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मल्लिका राजपूतच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मल्लिका राजपूत हिचा मृतदेह तिच्या सुल्तानपूर येथील घरात आढळून आल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री-गायिका मल्लिका राजपूत हिने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना मल्लिकाचा मृतदेह तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मल्लिकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या निधनानंतर आता चाहत्यांकडूनही शोक व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या सखोल तपास करत आहेत. मल्लिका राजपूत ही अभिनेत्री आणि गायिका असण्यासोबतच यूट्यूबर देखील होती. सध्या ती मुंबईत राहत होती.
मल्लिका राजपूतच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकाने मुंबईतील प्रदीप शिंदे जनार्दन नामक व्यक्तीशी लग्न केले होते. त्याच्याशी लग्न केल्यानंतर गेल्या चार-पाच वर्षांपूर्वीच तिने घर सोडले होते. मल्लिकाच्या मृत्यूनंतर तिच्या लग्नाच्या नात्यात काही अडचणी आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याचवेळी पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीनंतर तिचे घर सील करून तपास सुरू केला आहे.
मल्लिकाच्या निधनाच्या आदल्या रात्री तिचा तिच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण इतके वाढले होते की, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. यानंतर काय झाले आणि मल्लिकाने स्वतःचं आयुष्य का संपवलं? अशा सर्व प्रश्नांचा आता पोलीस तपास करत आहेत. मृत्यू दरम्यान ती नशेत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मल्लिका राजपूतने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतसोबत काम केले आहे. याशिवाय तिने आपल्या आवाजानेही लोकांची मने जिंकली आहेत. मल्लिका राजपूतने तिच्या ‘यारा तुझे’ म्युझिक अल्बमने खूप लोकप्रियता मिळवली होती. इतकेच नाही तर मल्लिकाने अनेक वेब सीरिज, सीरियल आणि अल्बममध्येही आपली जादू दाखवली होती.