Dolly Sohi Passes Away: टीव्ही जगतातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्व्हायकल कॅन्सरशी झुंज देणारी अभिनेत्री डॉली सोही अपयशी ठरली आहे. धक्कादायक म्हणजे अभिनेत्री डॉली सोही आणि तिची बहीण अमनदीप सोही यांचे एकाच दिवशी निधन झाले आहे. बहीण अमनदीप हिच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच डॉली सोहीचा देखील मृत्यू झाला आहे. डॉली गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी अर्थात सर्व्हायकल कॅन्सरशी झुंज देत होती, तर अमनदीपचा काविळने मृत्यू झाला आहे. ही दुःखद बातमी ऐकताच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री डॉली सोही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यूशी झुंज देत असतानाच, तिची बहीण अमनदीप सोही हिलाही काविळमुळे जीव गमवावा लागला. अवघ्या काही तासांच्या अंतराने या दोन्ही बहिणींनी अखेरचा श्वास घेतला. अमनदीप आणि डॉली यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही बहिणींच्या एकाच वेळी झालेल्या मृत्यूने केवळ कुटुंबच नाही, तर चाहते आणि तिच्या सहकलाकारांना देखील अतीव दु:ख झाले आहे. लोक दोन्ही बहिणींना श्रद्धांजली वाहत आहेत.
डॉली आणि अमनदीपच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दोन्ही बहिणी एकाच दिवशी गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमनदीप आणो डॉली यांचा भाऊ मनू याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डॉली आणि अमनदीप सोही दोघीही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होत्या. सर्व्हायकल कॅन्सरशी झुंज देत असताना देखील डॉलीने कधीही हिंमत गमावली नाही. या कठीण परिस्थितही ती नेहमीच तिचे काम अत्यंत मेहनतीने करत होती.
डॉली सोही हिला काही दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत होती. मात्र, तब्येतीच्या समस्यांमुळे तिला तिचा 'झनक' हा शो देखील सोडावा लागला होता. केमोथेरपी घेतल्यानंतर ती बराच काळ शूटिंग करू शकत नव्हती. यामुळेच तिने कामातून ब्रेक घेतला होता. पूनम पांडेच्या डेथ स्टंटवर डॉली सोहीने टीका केली होती, तेव्हा ती चर्चेत आली होती.