Devoleena Bhattacharjee Appeals to PM Modi: ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून ‘गोपी बहु’ बनून घराघरांत पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भारतीय दूतावासाकडे मदत मागितली आहे. अमेरिकेतून आपल्या मित्राचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी देवोलीनाने मदत मागितली आहे. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीचा मित्र अमरनाथ घोष याची अमेरिकेतील सेंट लुईसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अभिनेत्रीने आता त्याचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडे मदत मागितली आहे.
'साथ निभाना साथिया' आणि 'बिग बॉस' फेम देवोलीना भट्टाचार्जीने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने भारत सरकारकडून अमेरिकेतील एका मित्राच्या मृतदेह भारतात परत आणण्यासाठी मदत मागितली आहे. यासाठी तिने मदतीचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर, यूजर्स तिच्या या पोस्टवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने शुक्रवार, १ मार्च रोजी ट्विट केले आणि लिहिले की, 'माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी सेंट लुईस अकादमी, अमेरिकेजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबात तो एकटाच होता. त्याची आई ३ वर्षांपूर्वीच देवाघरी गेली होती. त्याचे वडील लहानपणीच वारले आहेत. त्यची हत्या करणाऱ्या आरोपींचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्याच्या काही मित्रांशिवाय त्याच्या कुटुंबात कोणीही नाही. तो कोलकाता येथे राहत होता.’
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने पुढे लिहिले की, 'तो एक उत्कृष्ट डान्सर होता, पीएचडी करत होता. कामातून मोकळा होऊन तो इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडला होता आणि चालत असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली. अमेरिकेतील काही मित्र त्याचा मृतदेह भारतात घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भारतीय दूतावासाने यात आमची मदत करावी. निदान त्याच्या हत्येचे कारण तरी कळायला हवे.’ आता अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे.