Ayesha Kapoor Casting Couch: मनोरंजन विश्वातून कास्टिंग काऊचच्या घटना सतत समोर येत असतात. हेमा समितीच्या अहवालानंतर आता अनेक अभिनेत्री स्वतःहून समोर येऊन याविषयी खुलासे करताना दिसत आहेत. यातच आता आणखी एक अभिनेत्री यावर बोलताना दिसली आहे. अभिनेत्री आयेशा कपूर हिने तिच्यासोबत घडलेल्या एका वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे. तिला सुरुवातच्या काळात अतिशय वाईट अनुभवाला समोरं जावं लागलं होतं. आयेशा कपूर हिने ‘शेरदिल शेरगिल’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आता तिची एक मुलाखत व्हायरल होत आहे.
अनेक लोक उराशी वेगवेगळी स्वप्न बांधून चित्रपटांच्या झगमगाटी विश्वात पदार्पण करत असतात. मात्र, काहींची स्वप्न पूर्ण होतात. तर, काहीना आयुष्यभराचे वाईट अनुभव मिळतात. शोबिझचे जग दिसते तितके सोपे नाही. यात अशा अनेक अंधाऱ्या गल्ल्या आहेत, ज्यात अडकल्यावर अनेकांना बाहेर पडणे कठीण होते. मात्र, जे यातून स्वतःला सावरतात त्यांना मोठे यश मिळते. आता आयेशाने सांगितलेल्या अनुभवानंतर देखील अनेकांना धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वात संघर्ष करत असताना एका दिग्दर्शकाने अभिनेत्रीला एक विचित्र ऑफर दिली होती.
अभिनयात करिअर करणं जसं सोपं नसतं, त्याचप्रमाणे अभिनयात पहिली संधी मिळणंही सोपं काम नाही. अनेकांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. आयेशा कपूरच्या बाबतीतही असेच घडले होते. आयेशा अनेक वेब सीरिज आणि टीव्ही शोमध्ये झळकली आहे. पण, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. आयेशाने तिच्या मुलाखतीत म्हणते होते की, 'मला नेहमीच अभिनेत्री बनायचे होते, पण माझा हा प्रवास सोपा नव्हता. मी सुरुवातीला अशा लोकांना भेटले, ज्यांनी मला सतत चुकीचे मार्गदर्शन केले. त्यावेळी मी अनेकांना ओळखत नव्हते. त्यामुळे कोणीही स्वत:ची ओळख कास्टिंग डायरेक्टर म्हणून द्यायचे आणि मी त्यात अडकायचे.’
आयेशाने तिच्या मुलाखतीत खुलासा केला की, एकदा तिला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आली होती, ज्यामध्ये तिला मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यात आले होते. पण, शोच्या दिग्दर्शकाने तिच्यापुढे एक अट ठेवली होती. तिने त्याच्याशी लग्न केले, तरच तिला ही मुख्य भूमिका मिळेल, असे तो म्हणाला. इतकंच नाही, तर त्याने अभिनेत्रीला मुंबईत लक्झरी लाईफही मिळेल, असं आमिष दिलं होतं. मात्र, अभिनेत्रीने त्याची ही ऑफर नाकारली. आयेशाने नाही म्हणताच तिला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. तर, तिला कामाचे पैसे देखील मिळाले नाहीत.
संबंधित बातम्या