FIR Against Shreyas Talpade: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी विपुल अंतिल यांनी मुरथल पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. इंदूर (मध्य प्रदेश) येथे नोंदणीकृत ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीशी संबंधित ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेल्याचा दावा विपुल अंतिल यांनी केला आहे. श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी या कंपनीचे प्रमोशन केल्याचेही विपुलने सांगितले. तर सोनू सूद कंपनीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
विपुल अंतिल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या कंपनीने लोकांकडून ६ वर्षांसाठी पैसे जमा केले. मुदत ठेवींसह (एफडी) अन्य मार्गांनी कंपनीत पैसे गुंतवल्यास अधिक परतावा देऊ, असे आश्वासन कंपनीने लोकांना दिले होते. इतकंच नाही तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने बॉलिवूड कलाकारांना देखील या योजने बाबत प्रमोट केलं होतं. महागड्या आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार देखील भरवण्यात आले होते. सुरुवातीला काही लोकांना पैसे दिले. परंतु, आता कंपनी लोकांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे.
तक्रारदाराने सांगितले की, हरियाणामध्ये त्यांची २५० हून अधिक सुविधा केंद्रे आहेत. ही सुविधा केंद्रे एजंटांकडून चालविली जात होती आणि वरिष्ठ अधिकारी केवळ ऑनलाइन पद्धतीने काम पाहत होते. लोकांना जेव्हा परतावा मिळणे बंद झाले तेव्हा त्यांनी कार्यालयात जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी कंपनीचे एजंट सुविधा केंद्राला कुलूप लावून पळून गेले. तर सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी मोबाइल बंद केले. त्यामुळे काही जणांनी या प्रकरणी तक्रार केल्यावर हा घोटाळा उघड झाला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्यासह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या