Actor Vidyadhar Joshi Health Update: नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते विद्याधर जोशी सध्या मनोरंजन विश्वातून ब्रेकवर गेले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्व देखील प्रचंड गाजवले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाप्पा जोशी अर्थात अभिनेते विद्याधर जोशी मनोरंजन विश्वात कुठेच दिसत नसल्याने चाहत्यांना प्रश्न पडला होता. नुकतीच विद्याधर जोशी यांनी सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनीही प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
अभिनेते विद्याधर जोशी हे गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. विद्याधर जोशी यांना झालेला हा आजार इतक्या गंभीर स्वरूपाचा होता की, यावर कोणत्याही प्रकारचे औषध देखील उपलब्ध नव्हते. विद्याधर जोशी यांना झालेला हा आजार फुफ्फुसाशी संबंधित असून, यादरम्यान त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करावी लागली आहे. या मुलाखतीत त्यांनी मृत्यूशी कशी झुंज दिली हे देखील सांगितले.
या आजाराविषयी बोलताना विद्याधर जोशी म्हणाले की, ‘मला चालताना, जिने चढताना भयंकर त्रास होत होता. अगदी दोन-तीन मजले चढलो तरीही मोठी धाप लागायची. बराच थकवा आणि त्रास जाणवू लागला होता. त्याच दरम्यान पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा कोव्हिड झाला. कोव्हिडमधून रिकव्हर होताना पण खूप त्रास झाला. त्यानंतर सतत ताप येत होता. मग, त्याच्यावर वेगवेगळी औषध घेतली. दरम्यान डॉक्टरांनी सिटीस्कॅन करायला सांगितलं. सिटीस्कॅन केल्यानंतर फुफ्फुसावर काही जखमा झाल्यासारखे दिसले. सुरुवातीला वाटलं की, ही जखम जखम कोरोनामुळे झाली असेल. मात्र, डॉक्टरांनी एक वेगळेच निदान केले.’
विद्याधर जोशी पुढे म्हणाले की, ‘यानंतर डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या करून घेतल्या आणि मला फुप्फुसाचा गंभीर आजार झाल्याचं निदान झालं. आता या सगळ्यांमध्ये मोठी अडचणीची गोष्ट म्हणजे या आजारावर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नव्हते. आता हा आजार नेमका कसा थांबवता येईल, यावर उपचार काय, या विचाराने मी घाबरून गेलो होतो. हा आजार थांबवता येत नाही, हेही डॉक्टरांनी सांगितले होते. या आजारामुळे माझं फुफ्फुस सुरुवातीला १३% निकामी झालं होतं. काही दिवसांनी ते १४% निकामी झाल्याचं लक्षात आलं. धक्कादायक म्हणजे अवघ्या महिनाभरातच १४%वरून फुफ्फुस ४३% निकामी झाल्याचं कळलं. हा आजार एवढ्यात बळावेल, असं वाटलं देखील नव्हतं.’ या दरम्यान विद्याधर जोशी यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. फुफ्फुसाच्या या गंभीर आजाराशी लढताना त्यांना मृत्यूशी देखील संघर्ष करावा लागला.