Balumamachya Navan Changbhala New Actor: ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे. गेल्या काही वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. प्रेक्षकही अगदी आस्थेने ही मालिका बघताना दिसतात. मात्र, आता या मालिकेविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मुख्य भूमिका म्हणजेच ‘बाळूमामां’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुमित पुसावळे याने या मालिकेला रामराम केला आहे. सुमितने ही मालिका सोडल्याचे कळताच आता सगळ्यांना धक्का बसला आहे. ‘बाळूमामांच्या भूमिकेत सुमित पुसावळे याला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते. आता या मालिकेत त्याच्याऐवजी एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.
अभिनेता सुमित पुसावळे याने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका का सोडली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सुमित आता एका नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत झळकणार आहे. कदाचित या नव्या भूमिकेसाठीच त्याने या मालिकेला निरोप दिला असावा, असे म्हटले जात आहे. आता ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत अभिनेते प्रकाश धोत्रे हे ‘बाळूमामा’ साकारताना दिसणार आहेत. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये मालिकेतील नव्या बाळूमामांचा चेहरा प्रेक्षकांना दाखवण्यात आला आहे.
‘सुरू होणार बाळू मामांचा एक नवा अध्याय’ असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेते प्रकाश धोत्रे हे बाळूमामांच्या भूमिकेत दिसले आहेत. या आधी देखील प्रकाश धोत्रे यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत त्यांनी अप्पा जहागीरदार म्हणजेच अभिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवून दिली होती. आता प्रकाश धोत्रे ‘बाळूमामा’ बनून प्रेक्षकांना मामांची महती दाखवताना दिसणार आहेत. येत्या ८ मार्चपासून म्हणजेच महाशिवरात्रीपासून हा मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत ‘बाळूमामा’ साकारण्याआधी प्रकाश धोत्रे यांनी बाळूमामांवर आधारित एका चित्रपटात देखील त्यांची भूमिका केली होती. एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत याची आठवण करून दिली आहे. या कमेंटमध्ये चाहत्याने लिहिले की, ‘प्रकाश धोत्रे सर तुम्ही बाळूमामा चित्रपटात खूप छान अभिनय केला होता बाळूमामांचा...’. तर, अनेक प्रेक्षक, चाहते आणि कलाकार या पोस्टवर कमेंट्स करून त्यांना मालिकेसाठी शुभेच्छा देत आहेत.