
Subodh Bhave: गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर बघायला मिळत आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून जल्लोषात स्वागत केलं जात आहे. घरगुती बाप्पा विराजमानही झाले आहेत. सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पांची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. मराठी अभिनेता सुबोध भावे याने अनोखा देखावा त्याच्या घरच्या बाप्पाला केला आहे. विकासाच्या नावावर निसर्गाची आपण हानी करतोय, निसर्गसुद्धा टिकायला हवा असा संदेश सुबोध भावेने दिला आहे.
सुबोध भावेने म्हटलं की, "दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव नव्हता, मात्र आनंदात विरजण पडलं नाही. कोरोना होता तरी दोन वर्षे उत्साहातच बाप्पांचे स्वागत केले होते. तुम्हाला नाचायला मिळालं नाही म्हणून नाराज होत असाल तर तो तुमचा मुद्दा पण माझ्या आनंदात फरक पडला नाही. भक्तीवर कधीच कसला फरक पडत नसतो."
घरच्या बाप्पाला केलेल्या देखाव्यातून सुबोध भावेने एक चांगला संदेश दिला आहे. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गावर अतिक्रमण करतो, त्यातून निसर्गाला मोठी हानी पोहोचवतो. पण आपण विकास करताना निसर्ग देखील टिकायला हवं असा संदेश त्यानं देखाव्यातून दिला आहे. सुबोध भावेने म्हटलं की, आम्ही यावेळी शाडूची मूर्ती तयार केलीय. आनंदी पृथ्वी आणि दु:खी पृथ्वी दाखवायचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीला किती दागिने हवेत? तिचे दागिने म्हणजे निसर्ग. विकासाच्या नावाखाली त्याची वाट लावली जातेय. विकास व्हावा पण निसर्गसुद्धा टिकला पाहिजे.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनी केली तेव्हा राष्ट्रशक्ती हा उद्देश होता. ब्रिटिशांची सत्ता तेव्हा होती, ब्रिटिश म्हणजे कोरोना. पण आता उत्सवाचं रूप बदललंय. गणपती मूर्तींमध्ये स्पर्धा सुरू आहे. तुझा बाप्पा मोठा की माझा अशी स्पर्धा व्हायला नको. स्पर्धा असायला हवी पण मूर्त्यांमध्ये कसली स्पर्धा असंही सुबोध भावेने म्हटलं.
किरकोळ कारणांनी भावना दुखावतात त्यावरूनही सुबोध भावेने सुनावलं आहे. त्याने म्हटलं की, आजकाल कोणाच्या भावना कशानेही दुखावतात. आमच्याकडून काही जरा झालं की लगेच भावना दुखावल्या जातात. तुम्ही पत्ते खेळता, दारु पिता तेव्हा तुमच्या धार्मिक भावना कुठे जातात असा प्रश्नही सुबोध भावेने विचारला.
संबंधित बातम्या
